EVM Diagnostic Test : देशात पहिल्यांदाच होणार EVM ची तपासणी; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, शिंदेंचा ‘हा’ आमदार अडचणीत?
EVM Diagnostic Test : मुंबई उच्च न्यायालयाने चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या 'डायग्नोस्टिक टेस्ट'चे आदेश दिले आहेत.

EVM Diagnostic Test : ईव्हीएमच्या ( EVM) विश्वासार्हतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रांची ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ (निदान चाचणी) करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. देशाच्या निवडणूक इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन नियमावलीनुसार होणारी ही पहिलीच चाचणी ठरणार आहे. (EVM Diagnostic Test)
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघात शिंदे गटाचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे नसीम खान यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये लांडे यांनी निसटता विजय मिळवला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत नसीम खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायमूर्तींनी ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले आहेत. EVM Diagnostic Test
येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी ही चाचणी पार पडणार आहे. बंगळुरूस्थित ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (BEL) चे तज्ज्ञ अभियंते या प्रक्रियेत सहभागी होतील. या अंतर्गत कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरच्या प्रोग्रामिंगची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार निवडणूक निकालानंतर यंत्रातील डेटाशी छेडछाड झाली आहे का, याचा तांत्रिक शोध घेतला जाणार असून यंत्राच्या ‘बर्न मेमरी’मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाणार आहे. (EVM Diagnostic Test)
हा विजयाचा पहिला टप्पा EVM Diagnostic Test
या निर्णयावर समाधान व्यक्त करताना नसीम खान म्हणाले की, हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. या तपासणीमुळे आता विद्यमान निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष या ‘डायग्नोस्टिक टेस्ट’च्या निष्कर्षाकडे लागले आहे.





