‘त्या’ भूमिकेवर ठाम! दिलेला इशारा खरा ठरणार? शरद पवारांचा विश्वासू नेता साथ सोडण्याच्या तयारीत

Prashant Jagtap : पुण्याच्या राजकारणात ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच राजकीय घडामोडी फार वेगाने घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाने पुण्यात धक्का देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांना गळाला लावले. खडकवासाला विधासनभेत भाजपच्या भीमराव तापकीर यांना कडवी झुंज देणारा नेता सचिन दोडके यांना भाजपने हेरले आणि त्यांनाही पक्षात सहभागी करून घेतले.
अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सतत रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते शहराध्यक्ष प्रशांत जगताप शरद पवार यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर आपण राजकारण थांबवू, असा सूचक इशारा त्यांनी दिला होता.
सोमवारी २२ डिसेंबर या दिवशी प्रशांत जगताप यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती मिळत आहे. आता सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. येत्या काही दिवसांवर महापालिका निवडणुका होणार असल्याने हालचालींना वेग आला असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. पुढील काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा समावेश नाही.
….तर ‘या’ पक्षांकडे जाण्याचा पर्याय स्विकारणार?
प्रशांत जगताप यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर ते ठाकरेसेना किंवा काँग्रेस पक्षाचा पर्याय स्विकारू शकतात. या पक्षांचा पर्याय घेऊन ते आगामी महापालिकेच्या निवडणुकीत देखील उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सहमती दर्शवली आहे.
हेही वाचा : अॅनिमल २ कधी येणार? अभिनेत्री सलोनी बत्राने दिली मोठी हिंट म्हणाली…





