Pune News : पुणे हादरलं..! शिवाजीनगर न्यायालयासमोर भरदिवसा गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; परिसरात मोठी खळबळ
Pune News : पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयासमोर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Pune News : शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयासमोर गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास न्यायालय परिसरात नागरिकांची आणि पक्षकारांची वर्दळ असतानाच चार ते पाच जणांनी एका व्यक्तीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत गोळीबारासह कोयत्यानेही वार करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune News)
खून प्रकरणातील आरोपीवर हल्ला?
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रजमधील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर हा हल्ला करण्यात आला. मंदार किवळे चार दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी तो कोर्टात आला असताना त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)
घटनास्थळी मॅगझीन आणि मोबाईल आढळला
हल्ल्यानंतर आरोपी तोफखाना चौकाच्या दिशेने पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी पिस्तुलाचे मॅगझीन आणि मोबाईल आढळल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीच्या दोन्ही हातांना मार लागल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले आहे. (Pune News)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला आणि हल्ल्यामागे कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Pune News)
दोन दिवसांपूर्वी कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune News)
Pune News : दारू पिण्यासाठी रिक्षांचे टायर, बॅटरी चोरणारा सराईत चोरटा अटकेत





