Fire Safety: थिएटर हाऊसफुल्ल, पण सुरक्षा रामभरोसे! ‘या’ नामवंत नाट्यगृहात तब्बल ४० अग्निशामक सिलिंडर्स कालबाह्य
Fire Safety: प्रवेशद्वार ते मेकअप रूमपर्यंतची सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय; तब्बल ४० हून अधिक सिलिंडर्स आणि फायर बॉल्सची मुदत संपल्याने खळबळ.

Fire Safety – सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये अग्निशामक यंत्रणा कालबाह्य (एक्स्पायर्ड) झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नाट्यप्रेमी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या या नाट्यगृहात शेकडो नागरिक दररोज नाटके आणि विविध कार्यक्रमांसाठी एकत्र येत असतात. अशा गजबजलेल्या ठिकाणी फायर सेफ्टी यंत्रणा निष्क्रिय असणे अत्यंत चिंताजनक बाब आहे.
सांगवी येथील नटससम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, सामाजिक उपक्रम तसेच शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे येथे बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची सतत वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी अग्निशामक यंत्रणा सक्षम असणे अत्यावश्यक असताना, मुदत संपलेले अग्निशामक सिलिंडर आढळल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाट्यगृहामध्ये प्रवेशद्वार, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, स्टेजच्या दोन्ही बाजू बॅकस्टेज परिसर, मेकअप रूम, साऊंड आणि लाईट कंट्रोल विभाग, इलेक्ट्रिकल पॅनल रूम, कॉरिडॉर जिने तसेच प्रेक्षक बसण्याच्या हॉल परिसर असे एकूण सुमारे ४० अग्निशामक सिलिंडर आणि फायर बॉल ठेवण्यात आलेले आहेत.मात्र, यापैकी अनेक यंत्रणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांनी नाट्यगृहातील सर्व अग्निशामक सिलिंडरची तातडीने तपासणी करून रिफिलिंग करावे तसेच संपूर्ण फायर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
सुरक्षा यंत्रणा रामभरोसे
नाट्यगृहाची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी बसवण्यात आलेली अग्निशामक यंत्रे ही मुदत संपलेली म्हणजेच कालबाह्य असल्याचे दिसून आले. आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे. काही ठिकाणी स्प्रिंकलर आणि पाण्याचे पाईप्स योग्य स्थितीत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
रसिक प्रेक्षकांमध्ये नाराजी
या गंभीर प्रकारानंतर स्थानिक नागरिक आणि रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने त्वरित या सर्व अग्निशामक सिलेंडर्सचे रिफिलिंग (पुन्हा भरणे) करावे आणि संपूर्ण नाट्यगृहाचे रीतसर फायर ऑडिट (अग्निसुरक्षा परीक्षण) करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सार्वजनिक वास्तूंच्या देखभालीकडे महानगरपालिका प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. ‘दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत,’ अशी मागणी होत आहे.





