Talegaon Dabhade : तळेगावकरांसाठी मोठी खूशखबर! ५ सार्वजनिक सभागृहांसाठी २.५३ कोटींचा निधी
Talegaon Dabhade : तळेगाव शहरातील रस्ते, सभागृहे आणि गटारांच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; २ कोटी ५३ लाखांचा निधी उपलब्ध.

Talegaon Dabhade – शहरातील पाच सार्वजनिक सभागृहांच्या उभारणीसाठी २ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी तीन सभागृहांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन सभागृहांची कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती नगरपरिषदेचे शहर अभियंता श्रीराम सरगर यांनी दिली. तळेगाव शहरातील रस्ते, सभागृहे, गटारे आणि इतर विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत आमदार सुनील शेळके यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
या विकासकामांसाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी विशेष प्रयत्न केले. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सोमवारपासून (दि. १) सुरू करण्यात आले. ते काम पावसाळ्यापूर्वी १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
तसेच काही ठिकाणी रस्त्याखाली पाणीपुरवठा आणि वीजवाहिन्यांची कामे सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. शहरातील पाच सार्वजनिक सभागृहांपैकी विद्याविहार कॉलनी येथील सभागृह (खर्च ६० लाख), राजगुरू कॉलनीतील सभागृह (खर्च ५० लाख) आणि टेल्को कॉलनीतील सभागृह (खर्च ५० लाख) पूर्ण झाले आहे.
तर हरणेश्वर कॉलनी आणि स्वराज नगरी येथील प्रत्येकी ५३ लाख रुपये खर्चाच्या सभागृहांची कामे वेगाने सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याचे श्रीराम सरगर यांनी सांगितले. या विकासकामांच्या अंमलबजावणीत शहर अभियंता श्रीराम सरगर, सहाय्यक अभियंता शुभांगी हाके आणि गौरी चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.




