प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी नेत्यांचे दौरे वाढणार आहेत. या नेत्यांच्या दौ-यासाठी अग्निशामकचा बंब अनिवार्य असतो. सभेसाठी अग्निशामक बंब बोलवायचा असल्यास महापालिका हद्दीमध्ये आठ तासांकरिता पाच हजार रुपये आणि हद्दीबाहेर ५० किलोमीटरच्या आता आठ तासांकरिता आठ हजार रुपये भरावे लागणार आहेत. राज्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. तर लवकरच महापालिका निवडणुकीच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे शहरात शासकीय बैठका आणि पक्षांच्या बैठकांसाठी राज्यातील मत्री महोदयांचे दौरे सुरू झाले आहेत. जर या नेत्यांचा शासकीय दौरा असेल तर शासनाच्या वतीने त्यांना प्रोटोकॉल म्हणून अग्निशामक दलाचा बंब निःशुल्क सोबत दिला जातो. जर हे नेते पक्षाच्या सभेसाठी प्रचारार्थ येणार असतील तर आयोजकांनी पोलिसांना दिलेल्या सल्ल्यानुसार अग्निशामकचा बंब भाडेतत्वावर घेण्यास सांगितले जाते. याचा खर्च सभेच्या आयोजकांवर किंवा पक्षांच्या स्थानिक कार्यकारिणीकडे असतो.अग्निशामक विभागाच्या वतीने शहराच्या हद्दीत कुठेही असा अशासकीय किंवा राजकीय पक्षाचा कार्यक्रम असल्यास आठ तासांकरिता (एका शिफटसाठी) पाच हजार रुपयांची आकारणी केली जाते. तसेच हद्दीच्या बाहेर ५० किलोमीटरच्या आत कार्यक्रम असल्यास प्रति शिफ्ट आठ हजार रुपये आणि ५० किलोमीटरच्या बाहेर असल्यास प्रति शिफ्ट १० हजार रुपये आकारणी अग्निशामक विभाग करीत असते.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी केंद्रीय मंत्रीदेखील प्रचारासाठी येत असतात. मात्र त्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील मंत्री येत असतात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अग्निशामक विभागाचे काम वाढणार असून त्यातून महसूलही महापालिकेला प्राप्त होणार आहे.