पुणे | अखेर पुराची भीती खरी ठरली…

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुठा नदीपात्रात खडकवासला धरणापासून ते म्हात्रे पुलापर्यंत राजरोसपणे होत असलेली अतिक्रमणे आणि महापालिकेकडून बंडगार्डन ते मुंढवा पुलापर्यंत उभारल्या जात असलेल्या नदीकाठ विकसन प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होणार असल्याने शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवेल, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत होती, ती गुरुवारी मुठा नदीला आलेल्या पुरामुळे खरी ठरली आहे.
ज्या वेळी एकतानगरी, विठ्ठलवाडी, निंबजनगर आणि डेक्कन परिसरात पूर आला, त्या वेळी केवळ ३५ हजार क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले होते. २०११ मध्ये याच भागात ७१ हजार क्यूसेक पाणी सोडल्यानंतर पूर आला होता, तर २०१९ मध्ये ४७ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर पूरस्थिती उद्भवली होती. त्यामुळे मागील १३ वर्षांत नदीची वहन क्षमता तब्बल ४० टक्के घटली असल्याचे या पूराने सिद्ध केले आहे.
नदीत तयार केल्या जागा
गेल्या दशकभरात खडकवासला धरण ते म्हात्रे पुलापर्यंत नदीपात्राच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. कर्वेनगरच्या बाजूला ही अतिक्रमणे सर्वाधिक असून, या बाजूला नदीपात्रात पाटबंधारे विभागाच्या हद्दीत राडारोडा टाकून मोठ्या प्रमाणात जागा तयार करण्यात आल्या आहेत.
या अतिक्रमणांबाबत शहरातील पर्यावरण अभ्यासकांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल करत ही अतिक्रमणे निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महापालिकेस ती काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेने त्याकडे नेहमीप्रमाणे दुलर्क्ष केल्याने ही अतिक्रमणे वाढली असून, कर्वेनगरच्या बाजूने नदीपात्र अरुंद झाले आहे.
परिणामी, नदीत सोडलेले पाणी एकतानगरी परिसरातील लोकवस्तीत जात आहे. त्यामुळेच या भागातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये ५० हजार क्यूसेकला पाणी येत होते. मात्र, यंदा ३५ हजार क्यूसेकला अनेक सोसायटयांचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे.
नदी सुधारचाही फटका
महापालिकेकडून मुठा नदीच्या दोन्ही काठांवर तब्बल ४४ किलोमीटरचा नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे पहिल्या टप्प्याचे काम बंडगार्डन येथे सुरू असून, नदीपात्र आतील बाजूस घेण्यात आले आहे. परिणामी, मुठा नदीत एकदम मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर पाण्याचा फुगवटा मागील बाजूस येऊन या भागाला फटका बसला आहे.
याशिवाय दहा वर्षांपूर्वी भिडे पूल १८ हजार क्यूसेक पाणी सोडल्यानंतर, तर टिळक पूल ५५ हजार क्यूसेक पाणी सोडल्यानंतर पाण्याखाली जात होता. मात्र, या वर्षी भिडे पूल अवघ्या दहा हजार क्यूसेक पाण्याने, तर टिळक पुलावरून ३५ हजार क्यूसेक पाणी वाहून गेले. विशेष म्हणजे टिळक पुलावरून पाणी पहिल्यांदाच महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोरील रस्त्यांवरही आल्याचे पाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे हे पाणी लकडी पुलाच्या अवघ्या तीन ते चार फूट खालून वाहत होते.
मुळात पाटबंधारे विभाग आणि महापालिकेकडून चुकीच्या पूररेषा आखल्या आहेत. त्यामुळे नदीकाठावर त्याचा आधार घेत अतिक्रमणे झाली आहेत. त्यातच नदीपात्र नदीकाठ विकसनामुळे अंकुचित झाले आहे, तसेच ही योजना करताना ओढ्या, नाल्यांचा विचारच केलेला नाही. त्यामुळे आज ना उद्या ही स्थिती उद्भवणारच होती.
आज फक्त खडकवासला धरणातून पाणी सोडले. पुढील दोन महिन्यांत वरसगाव, टेमघर, पानशेत, धरले भरली, तरी तब्बल १ लाख क्यूसेक पाणी सोडावे लागेल. ते अतिशय भयवाह असेल. त्यामुळे वेळीच जागे होणे गरजेचे आहे. – विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)
हा पूर म्हणजे प्रशासनाची उदासीनता आणि अंसवेदनशीलतेचे प्रतीक आहे. नदीतील अतिक्रमणांबाबत आम्ही अनेकदा न्यायालयात गेलो. न्यायालयाने कारवाईचे आदेशही दिले. मात्र, निर्ढावलेले प्रशासन काहीच कारवाई करण्यास तयार नाही. ही वेळ कधी ना कधी येणारच होती. भविष्यात यापेक्षा आणखी कमी पाणी सोडल्यावरही पूरस्थिती उद्भवण्याची भीती आहे. – अॅड, वंदना चव्हाण ( माजी खासदार)




