- प्रशासनाची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
देहूगाव – श्रीक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायत हद्दीतील नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 2) जाहीर केली आहे. कोविड-19 च्या महामारीमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासनाच्या वतीने सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी प्रारंभ केल्याचेही दिसून येत आहे.
श्रीक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायत 17 सदस्यांची असल्याने सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीचे सहा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये केवळ दोन सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर इतर सर्व प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 सदस्य निवडून द्यायचे आहेत. नव्या प्रभाग रचनेमुळे ग्रामपंचायतीमध्ये 8 पुरुष व 9 महिला असल्याने महिला राजची पुनरावृत्ती दिसणार आहे. गत पंचवार्षिकतेत असलेली प्रभाग रचनेत फेरबदल करण्यात आला असून राखीव जागांचे आरक्षणही बदलण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक एक
पूर्ण माळीनगर व बोडकेवाडीचा समावेश आहे. यात एक जागा सर्वसाधारण प्रवर्ग, एक जागा ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग तर एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे.
प्रभाग क्रमांक दोन
देहूगाव गावठाण भागाचा समावेश असून एक जागा सर्वसाधारण प्रवर्ग, एक जागा ओबीसी महिला व एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
प्रभाग क्रमांक तीन
चव्हाणनगर व वडाचा माळ या भागाचा समावेश करण्यात आला आहे. तर एक जागा अनुसूचित जाती पुरुष व एक जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. या वार्डमध्ये केवळ दोन जागा आहेत.
प्रभाग क्रमांक चार
एसटी स्टॅंड (बस स्थानक) पासून, कंद पाटीलनगर, भीमाशंकर सोसायटी ते गायरान सर्व्हे नंबर 92 पर्यंतच्या भागाचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये एक जागा सर्वसाधारण प्रवर्ग, एक जागा अनुसूचित जमाती महिला व एक जागा ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग असणार आहे.
प्रभाग क्रमांक पाच
विठ्ठलनगर देहू आळंदी मार्गावरील युनिकेअर हॉस्पिटलपासून रस्त्याची डावी बाजू, तळवडे शीवपर्यंतचा संपूर्ण भागाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभागामध्ये एक जागा सर्वसाधारण प्रवर्ग, एक जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव व एक जागा ओबीसी महिलेसाठी राखीव असणार आहे.
प्रभाग क्रमांक सहा
विठ्ठलनगर देहू आळंदी रस्त्याची उजवी बाजू म्हणजे तळवडे विठ्ठलनगर येथील शिवेवरील मारुती काळोखे चौक ते देहूगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या संपूर्ण भागाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एक जागा सर्वसाधारण खुला प्रवर्ग, एक जागा ओबीसी महिला व एकजागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव असणार आहे.
सरपंच पदाची उत्सुकता
मागील पंचवार्षिकमध्ये सर्वसर्वसाधारण महिला सरपंचपद राखीव होते. या वेळी हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांची उत्सुकता आहे.