Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य
Pune District : नदीपात्रालगत खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक स्टॉल आहेत. या परिसरात नाशवंत खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, अन्य कचरा तसेच मांसाचे अवशेष टाकले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नारायणगाव : ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा नारा देत विविध स्वच्छता उपक्रम राबविले जात असताना नारायणगावच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावरील मीना नदीच्या पुलाच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणार्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नारायणगावच्या सौंदर्यात भर घालणारे मीना नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नदीतील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी द्रावणाचा वापर करून ‘स्वच्छ नदी, सुंदर नदी’ हा उपक्रमही राबविण्यात आला. मात्र, नदीच्या प्रवेशद्वारालगतच कचर्याचे ढीग साचत असल्याने या स्वच्छता मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नदीपात्रालगत खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक स्टॉल आहेत. या परिसरात नाशवंत खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, अन्य कचरा तसेच मांसाचे अवशेष टाकले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात असल्याने सकाळी या परिसरात कावळे, कुत्रे आणि अन्य भटक्या प्राण्यांची गर्दी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा वाढत गेल्याने तो थेट मीना नदीच्या पात्रात जाण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी एका बाजूला उपाययोजना सुरू असताना नदीकाठावरच कचरा साचत असल्याने नदी प्रदूषणाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे.
या समस्येबाबत यापूर्वीही अनेकदा वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून काही वेळा कचरा हटविला जातो; मात्र काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी कचर्याचे ढीग दिसून येतात. ‘कचरा टाकू नये’, ‘कारवाई करण्यात येईल’ असे फलक लावले जात असले तरी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर सातत्याने दंडात्मक कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. केवळ कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यापेक्षा कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून निर्माण होणार्या कचर्याची योग्य विल्हेवाट, नियमित स्वच्छता आणि प्रभावी देखरेख यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची गरज आहे.
प्रशासनाला जाग येणार कधी?
नारायणगावचे प्रवेशद्वार असलेल्या या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होते. त्याचबरोबर ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरालगतचा हा परिसर धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. अशा ठिकाणी कचर्याचे ढीग आणि दुर्गंधी असणे ही नारायणगावच्या स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे. मीना नदीचे प्रदूषण आणि प्रवेशद्वारावरील अस्वच्छता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कचरा हटविण्याची तात्पुरती कारवाई न करता कचरा पुन्हा साचणार नाही, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.





