Narayangaon : कुबेर अंगण गणेश मंडळाचा ग्रामवैभव देखावा
Narayangaon : पूर्वीच्या काळातील साधे, कष्टकरी आणि निसर्गाशी एकरूप असलेले ग्रामीण जीवन या देखाव्यातून जिवंत करण्यात आले आहे.

नारायणगाव : आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात हरवत चाललेल्या ग्रामीण जीवनशैलीची, संस्कृतीची आणि परंपरेची आठवण करून देणारा ‘ग्रामवैभव’ देखावा कोल्हे मळा येथील कुबेर अंगण गणेशोत्सव मित्र मंडळाने साकारला आहे. जुन्या काळातील ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्र उभे करणारा हा देखावा गणेशभक्तांसह नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
पूर्वीच्या काळातील साधे, कष्टकरी आणि निसर्गाशी एकरूप असलेले ग्रामीण जीवन या देखाव्यातून जिवंत करण्यात आले आहे. पाचटाचे छत असलेले पारंपरिक घर, मातीची चूल, पणती, दिवा, कंदील, बैलगाडी, घंगाळ, मडके, केरसुणी, फुलांची परडी, सूप, भिंतीतील कोनाडी, फुलांच्या माळा आणि सारवलेली जमीन अशा असंख्य पारंपरिक वस्तूंचा कल्पक वापर करून जुन्या ग्रामीण घराचे हुबेहूब चित्र उभे करण्यात आले आहे.
एकेकाळी ग्रामीण कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या वस्तू आजच्या पिढीसाठी अपरिचित होत चालल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक वातावरणासोबतच आपल्या मातीतील संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनशैलीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. शहरीकरणामुळे बदलत चाललेल्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर ‘ग्रामवैभव’ देखाव्यातून ग्रामीण जीवनातील साधेपणा, कष्ट आणि परंपरांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
कुबेर अंगण गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश शिरोळे आणि पदाधिकार्यांनी देखावा साकारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. गणेशभक्तांनी या देखाव्यास भेट देऊन ग्रामीण संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





