Indapur : शेतीपिकांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
Indapur : या दौऱ्यात पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, सुकलेली अथवा नुकसानग्रस्त पिके तसेच शेतकऱ्यांसमोरील स्थानिक अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे.

इंदापूर : पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही भागांत शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीची केवळ कागदोपत्री माहिती न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री भरणे १९ व २० सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या दौऱ्यात पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, सुकलेली अथवा नुकसानग्रस्त पिके तसेच शेतकऱ्यांसमोरील स्थानिक अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांकडून परिस्थितीचा प्रशासकीय आढावाही घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पर्जन्यस्थिती आणि त्याचा शेतीपिकांवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कार्यालयीन अहवालांवर अवलंबून न राहता मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन जाणून घ्याव्यात,अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केवळ कार्यालयातील अहवाल पुरेसे नाहीत. त्यांच्या बांधावर जाऊन पिकांची आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
नांदेडपासून पाहणीला सुरुवात
१९ सप्टेंबर रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पुयणी येथे प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली जाणार आहे. यानंतर हिंगोली जिल्ह्यातील बोराला व हिवरा तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांना भेट देऊन शेतातील पिकांची पाहणी केली जाणार आहे.
अकोल्यात अमरावती विभागाचा आढावा
२० सप्टेंबर रोजी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक होणार आहे. बैठकीला पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुपारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित उद्घाटन व शिवार फेरी कार्यक्रमासही कृषिमंत्री उपस्थित राहणार आहेत.





