Pune District : आंबेगाव तालुक्यात महालक्ष्मीचे उत्साहात आगमन
Pune District : पूजनासाठी विविध प्रकारचे नैवेद्य तयार करण्यात आले असून, सुवासिनींनी एकमेकींच्या घरी जाऊन हळदी-कुंकू समारंभात सहभाग घेतला.

मंचर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये महालक्ष्मीचे उत्साहात आगमन झाले. घराघरांत पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मीची स्थापना करून महिलांनी धार्मिक विधी व पूजनातून स्वागत केले.
महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त घरांची स्वच्छता करून आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अवसरी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेवतीताई प्रशांत वाडेकर यांच्या निवासस्थानीही पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मीची आरास करण्यात आली आहे.
पूजनासाठी विविध प्रकारचे नैवेद्य तयार करण्यात आले असून, सुवासिनींनी एकमेकींच्या घरी जाऊन हळदी-कुंकू समारंभात सहभाग घेतला. मंचर, कळंब, घोडेगाव, अवसरी, लांडेवाडी, पारगाव परिसरातील गावांमध्ये महालक्ष्मीच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नागरिकांनी कुटुंबीयांसह महालक्ष्मीचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाबरोबरच महालक्ष्मीच्या आगमनामुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक प्रसन्न झाले आहे.





