FIH Hockey Women’s Junior World Cup 2023 : भारताला जर्मनीकडून पराभवाचा धक्का…

सॅण्डियागो :- ज्युनिअर गटाच्या महिला हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्या सामन्यात अफलातून कामगिरी केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला जर्मनीकडून मात्र पराभवाचा धक्का बसला. कॅनडावर तब्बल १२ गोल केलेल्या भारतीय संघाने जर्मनीविरुद्धही २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाचा बचाव कमी पडला व त्यांना ४-३ असा पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्या लढतीत तीन गोल केलेल्या अन्नुने या सामन्यात ११ व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. रुप्नी कुमारीने १४ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. त्याचवेळी जर्मनीनेही भारताचा बचाव भेदताना पहिला गोल नोंदवला. हा गोल सोफिया शेवादेने १७ व्या मिनिटाला केला.
लौरा फ्लुतने २१ व्या मिनिटाला गोल केला व संघाला सामन्यात २-२ अशी बरोबरी साधून दिली. यावेळी भारताची स्टार खेळाडू मुमताज खानने २४ व्या मिनिटाला गोल करत भारता पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत प्रत्येक क्षणाला सामन्याचे पारडे एका संघाकडून दुसर्या संघाकडे फिरत होते.
FIH Hockey Women’s Junior World Cup 2023 : चक दे इंडिया! भारताने कॅनडाचा 12-0 ने उडवला धुव्वा
लौरा फ्लुतने आपला आणखी एक गोल करताना ३६ व्या मिनिटाला भारताचा बचाव भेदला. त्यानंतर दोनच मिनिटांनी कॅरोलिन सेडेल्सने ३८ व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी ४-३ अशी वाढवली. त्यानंतर भारताच्या खेळाडूंनी गोल करण्याचे केलेले अनेक प्रयत्न फोल ठरले व याच गोल फरकाच्या जोरावर जर्मनीने भारताचा पराभव केला. आता या स्पर्धेत आज( शनिवार) भारताचा साखळीतील पुढील सामना बेल्जियमशी होणार आहे. या स्पर्धेती आव्हान टीकवण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.





