पंढरीसी जारे आल्यानो संसारा

होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।
काय करावी साधने । फळ अवघिचे येणे ।।
अभिमान नुरे । कोड अवघिचे पुरे ।।
तुका म्हणे डोळा । विठो बैसला सावळा ।।
==============
पंढरीसी जारे आल्यानो संसारा ।
दीनाचा सोयरा पांडुरंग ।।
वाट पाहे उभा भेटीची आवडी ।
कृपाळू तातडी उताविळ ।।…
देहूगाव – करोना महामारीमुळे मागील दोन वर्षे आषाढीचा पायी वारी सोहळा झाला नाही. त्यामुळे राज्यात महावैष्णव आणि वारकऱ्यांना हा अनुपम्य सोहळा अनुभवता आला नाही. संस्थानच्या वतीने एसटी बसच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरीला नेहण्यात आल्या होत्या. परंतु यावर्षी करोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने आषाढी वारीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संत तुकाराम महाराजांच्या वरील अभंगाचे स्मरण करत पालखी प्रस्थानासाठी तीर्थक्षेत्र देहू येथे आले आहेत.
ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करत टाळ, मृदंगाच्या निनादात लाखो वैष्णव ठेका धरत मोठ्या भक्तिमय वातावरणाने देहूनगरी दूमदुमून गेली आहे. इंद्रायणीचा घाट आणि नदीच्या दोन्ही तिरावर लाखो वैष्णावांची मांदियाळी नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेली पाहण्यास मिळत आहे.जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी (दि.20) भक्तिमय वातावरणात पंढरीकडे प्रस्थान ठेवले. तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिराच्या भजनी मंडपामध्ये दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडला.
सकाळी 11 वाजता घोडेकर सराफ यांच्याकडील चकाकी करण्यात आलेल्या संत तुकोबांच्या पादुका परंपरेप्रमाणे मान असणाऱ्या म्हसलेकर कुटुंबातील प्रकाश ज्ञानदेव सोळंके (म्हसलेकर) यांनी पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम’ हरिनामाच्या जयघोषात दिंड्यांसह इनामदारवाड्यात आणल्या. याठिकाणी हभप दिलीप गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन झाले. दुपारी साडे बाराच्या सुमारास सोळंके (म्हसलेकर) यांनी पादुका डोक्यावर घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात मुख्य मंदिरात मंदिर प्रदक्षिणेनंतर भजनी मंडपात आणल्या.
या सोहळ्याला देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, उपजिल्हाधिकारी संजय असवले, तहसीलदार गीता गायकवाड, माजी मंत्री उल्हास पवार, तहसीलदार प्रवीण ढमाले, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, देहू शहराध्यक्षा रेश्मा मोरे यांसह नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांचा सन्मान
महापूजेनंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. या वेळी संस्थानच्या वतीने मानकरी, विणेकरी यांचा फेटा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर टाळ, मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान ठेवल. खांदेकऱ्यांनी पालखी खाद्यांवर घेताच भाविकांनी पुंडलिका वरदा हरी विठ्ठल…’ जयघोष केला.
सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणेनंतर मंदिराच्या बाहेर पडली. अग्रभागी दोन मानाचे अश्व, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, दिंडीकरी, भाविक, वारकरी आदीं सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा देहूतील इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात विसावली.
ठेव माझा मिराशी । ठाव तुझे पायापाशी ।।
याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ।।
हा अभंग म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली. इनामदारवाड्यात रात्री म्हातारबुवा खणेपुरीकर दिंडीचे कीर्तन झाले. त्यानंतर पहाटेपर्यंत वेणुरकर दिंडीचा जागर सुरू होता. इनामदारवाड्यातून पालखी सोहळा मंगळवारी (दि. 21) सकाळी अकराच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. दुसऱ्या मुक्कामासाठी पालखी सोहळा रात्री आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात विसावणार आहे.





