Sant Tukaram Maharaj Beej : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बिज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांसाठी नगरपंचायतीकडून विविध सोयी-सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उर्वरित कामांची लगबग अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. बीज सोहळ्यानिमित्त नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, विविध विभागांमार्फत आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात येत आहेत. नगरपंचायत कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, शौचालये, स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष तसेच पाण्याचे टँकर उभारण्यात येत आहेत. सुमारे ७० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम यांनी दिली. नगरपंचायत हद्दीतील पथदिव्यांची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त दिवे बसविण्यात आले आहेत. गाथा मंदिर, भैरवनाथ चौक, वैकुंठ मंदिर, इंद्रायणी नदी घाट, मुख्य मंदिरामागील ब्राह्मणघाट, महाद्वार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मुख्य प्रवेशद्वार अशा प्रमुख ठिकाणी एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात एकाच ठिकाणाहून सूचना प्रसारित करण्यासाठी विद्युत खांबांवर ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. Shabana Azmi: “आता मला कोणीच नॅशनल अवॉर्ड देत नाही”; शबाना आझमी असं का म्हणाल्या?, ‘लाहोर १९४७’बद्दलही मोकळेपणाने बोलल्या” प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, सहा ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत, अशी माहिती स्थापत्य अभियंता संघपाल गायकवाड यांनी दिली. शासनाकडून ९ तर नगरपंचायतीकडून ५ असे एकूण १४ फिरते पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी ज्ञानेश्वरी शिंदे यांनी सांगितले. भक्तनिवास परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागाशेजारी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. गावठाण परिसरासह इंद्रायणी नदी घाट, मुख्य मंदिर परिसर आणि रिंगरोड परिसरात अतिरिक्त मनुष्यबळासह स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. औषध आणि धुरफवारणी सुरू असून, स्वच्छतागृहे व दुर्गंधीयुक्त ठिकाणी ओडो फ्रेशची फवारणी करण्यात येत आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकण्यात आली असून, सक्शन वाहनाद्वारे सांडपाण्याच्या चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागप्रमुख कविता पाटील यांनी दिली. बीज सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केल्याचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी स्पष्ट केले. Pune News : क्षेत्रीय कार्यालयांची कसोटी; महिनाभरात काढाव्या लागणार दीडशे कोटींच्या निविदा