Dehu News : सदेह वैकुंठगमनाचा सोहळा! तुकाराम बीजेनिमित्त देहूत भक्तीचा महापूर; पाहा आजचे खास कार्यक्रम
Dehu News : प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि सोयी-सुविधा; १२ मार्चपर्यंत देहूत रंगणार आध्यात्मिक सोहळ्याची पर्वणी.

Dehu News – श्रीक्षेत्र देहूनगरीमध्ये आज जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक राज्यभरातून देहूनगरीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. भगव्या पताका, हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद, अभंगांच्या मधुर स्वरलहरींनी देहू व आसपासच्या परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.
तसेच आज सकाळपासूनच टाळ-मृदंगाच्या तालात आणि मुखाने हरीनाम घेत भाविक देहूत दाखल होत होते. गर्दीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनानेही खरदारीचा उपाय म्हणून विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने देहूनगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचं वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झालं असं मानलं जातं. संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठात नेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज असे म्हटले जाते.
तुकाराम महाराजांचं वैकुंभगमन देहू (पुणे) येथे इ.स. 1649 मध्ये झाले, असं वारकरी संप्रदाय मानतो. या दिवशी नांदुरकी वृक्ष (देहू येथील एक झाड) दुपारी 12.02 वाजता हलतो, असा भक्तांचा विश्वास आहे. हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो.
श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत श्री तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा आठवडा भर चालणार असून दि. १२ मार्च रोजी या सोहळ्याची सांगता होईल. धार्मिक कार्यक्रम मुख्य मंदिर व वैकुंठगमन स्थान येथे होणार आहेत.
आजचे कार्यक्रम
-पहाटे ३ वाजता काकडा आरती.
-पहाटे ४ वाजता अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते श्रींची महापुजा व शिळा मंदिर महापुजा.
-सकाळी ६ वाजता वैकुंठगमन स्थान श्री संत तुकाराम महाराज महापुजा.
-सकाळी १० ते १२ वैकुंठगमन स्थान येथे वैकुंठगमन प्रसंगावर ह. भ. प. देहूकर महारांजाचे किर्तन
-सकाळी १०.३० वा. मुख्य मंदिरातून श्री पालखी वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) कडे प्रस्थान.
-दुपारी १२.३० वा. पालखी वैकुंठ स्थान मंदिराकडून मुख्य मंदिराकडे आगमन.





