Dehu News – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे साकारत असून या पवित्र कार्यात सहभागी होणारे सर्व भाविक भाग्यवान आहेत, असे प्रतिपादन पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचे वंशज हभप श्रीगुरू केशव महाराज नामदास यांनी केले.संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी जयंती आणि तपोनिधी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्य वर्षानिमित्त छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सातव्या दिवशी हभप केशव महाराज नामदास यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.भंडारा डोंगर हा जगद्गुरू तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असून येथे महाराजांनी मोठी तपश्चर्या केली. या डोंगराच्या मातीला महाराजांच्या चरणरजांचा स्पर्श लाभल्याने या भूमीचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. आई जिजाई विठ्ठल नामाचा आवाज ऐकत महाराजांचा शोध घेत डोंगरावर जाऊन त्यांची सेवा करत असत, अशी माहितीही त्यांनी सांगितली. या सोहळ्यात पहाटे काकडा, विठ्ठल-रुक्मिणी व तुकोबारायांच्या मूर्तींची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. सकाळच्या सत्रात ज्ञानेश्वरी व गाथा पारायण झाले. दुपारी युवा कीर्तनकार हभप संतोष महाराज पायगुडे यांची कीर्तन सेवा झाली, तर छोटे माऊली महाराज कदम यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर कथाकथन केले.