ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या

आळंदी: पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळा पूर्ण करून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आहेत. संत तुकाराम महाराज यांची पालखी आज, 19 जुलै रोजी पिंपरी येथे मुक्कामी आहे, तर उद्या, 20 जुलै रोजी ती आळंदी येथे पोहोचणार आहे. 21 जुलै रोजी ही पालखी देहूगाव येथे दाखल होईल. दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 20 जुलै रोजी आळंदीत येणार आहे. या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पालखी मार्गावर वाहतूक कोंडी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल जाहीर केले असून, सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी 19 ते 21 जुलै 2025 या कालावधीत वाहतूक नियंत्रणासाठी विशेष अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत दिघी-आळंदी, भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि तळवडे वाहतूक विभागांतर्गत अनेक मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना, विशेषतः जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
या निर्बंधांमधून रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, पोलिस वाहने आणि दिंडीतील वाहने वगळण्यात आली आहेत. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्ग –
दिघी-आळंदी वाहतूक विभाग (20 जुलै, दुपारी 2 ते रात्री 8):
पुणे मार्गे आळंदी (अलंकापुरम चौक/चहोली फाटा), मोशी मार्गे आळंदी (डुडुळगाव जकात नाका), मरकळ चौक मार्गे नगरपरिषद चौक आणि चाकण मार्गे आळंदी (जोग महाराज संस्था) या मार्गांवर सर्व वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: अलंकापुरम चौक-जयगणेश साम्राज्य-मोशी-चाकण, चहोली फाटा-धानोरे फाटा-मरकळ, डुडुळगाव जकात नाका-केळगांव बायपास, चाळीस फुटी रस्ता-वडगांव रोड-पीसीएस चौक मार्गे इच्छित स्थळी.
पुणे-विश्रांतवाडी-बोपखेल मार्गे चाकण (देहू फाटा चौक) आणि चाकण चौक-प्रदक्षिणा मार्गावरही वाहनांना मनाई.
भोसरी वाहतूक विभाग (20-21 जुलै): 20 जुलै रोजी सकाळी 6 ते रात्री 8:
अनुकूल चौक ते लांडेवाडी चौक आणि खडी मशीन चौक ते अलंकापुरम चौक मार्गे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: स्पाइन रोड, 100 फुटी रोड.
21 जुलै रोजी सकाळी 6 ते दुपारी 4: भारतमाता चौक ते लक्ष्मी चौक मार्गे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: पांजरपोळ चौक मार्गे स्पाइन रोड.
पिंपरी वाहतूक विभाग (19-20 जुलै): 19 जुलै (दुपारी 2 ते रात्री 8) आणि 20 जुलै (सकाळी 5 ते दुपारी 12):
नाशिक फाटा ते पिंपरी चौक, पिंपरी पूल, शगुन चौक, गेलाई चौक, डिलक्स चौक आणि केएसबी चौक मार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर, मोरवाडी चौक, साई चौक अंडरपास, जाधव वडेवाले चौक-पॉवर हाऊस चौक, थरमॅक्स चौक मार्गे इच्छित स्थळी.
चिंचवड वाहतूक विभाग (20 जुलै, सकाळी 5 ते दुपारी 12):
चाफेकर चौक-एल्प्रो मॉल-लिंक रोड, काळेवाडी-मोरया हॉस्पिटल चौक, एस.के.एफ चौक-अहिंसा चौक, टायटन शोरूम-छत्रपती शिवाजी चौक आणि गवळीवाडा-केएसबी चौक मार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: रिव्हर व्ह्यू चौक, गांधी पेठ-मोरया गोसावी मंदिर, रांका ज्वेलर्स ग्रेडसेपरेटर, टायटन शोरूम ग्रेडसेपरेटर मार्गे.
तळवडे वाहतूक विभाग (21 जुलै, सकाळी 6 ते सायंकाळी 6):
देहूगाव-लक्ष्मी चौक-मोशी, त्रिवेणीनगर चौक-तळवडे गावठाण, मोईगाव वाय पॉइंट-डायमंड चौक, कुदळवाडी ब्रिज-डायमंड चौक आणि निघोजे फाटा-कॅनवे चौक मार्गे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: महिंद्रा सर्कल, तळेगाव मार्ग, स्पाइन रोड-पांजरपोळ चौक, मोई-कुरुळी मार्गे पुणे-नाशिक रोड.
प्रशासनाची तयारी आणि नागरिकांना आवाहन-
पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले की, हे वाहतूक बदल अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, अग्निशामक, पोलिस वाहने) आणि दिंडीतील वाहने वगळता सर्व वाहनांना लागू आहेत. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक चालू किंवा बंद केली जाईल. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





