Fake Police Verification : पुण्यात बनावट पोलीस व्हेरिफिकेशनचं मोठं रॅकेट; एका चुकीमुळे तरुणाची नोकरी गेली
Fake Police Verification : बनावट पोलीस व्हेरिफिकेशन प्रकरणी पुण्यात एकाला अटक, पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

Fake Police Verification – शहरात बनावट पोलीस व्हेरिफिकेशन काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, या बनावट व्हेरिफिकेशनमुळे तक्रारदाराला हाती आलेली नोकरी गमवावी लागली आहे.
तक्रारदार बीशल नरिपंठेद्र सिन्हा (२८, रा. वैदुवाडी, सेनापती बापट रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यानी खराडी येथील एका खासगी सुरक्षा कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. कंपनीने पोलीस व्हेरिफिकेशन सादर करण्याची अट घातली होती. यावेळी त्यांचा मित्र भैय्याराम अहिरवाल याने ‘बिपीन’ नावाच्या व्यक्तीकडून तातडीने पोलीस व्हेरिफिकेशन करून मिळेल, असे सांगितले.
त्यासाठी तक्रारदाराने २७ मार्च रोजी सायंकाळी ११०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर काही तासांतच व्हॉट्सॲपवर पोलीस व्हेरिफिकेशनची पीडीएफ फाईल व रिसीट पाठवण्यात आली. मात्र, ३० मार्च रोजी कंपनीकडून पडताळणी केल्यानंतर हे कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तक्रारदाराची नोकरीही नाकारण्यात आली.
त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीत बिपीन सिंग (रा. औंध) याने हे बनावट कागदपत्र अजिंक्य प्रकाश साळुंके (रा. खडकी) याच्याकडून तयार करून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी साळुंके याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मोबाईलवरील पीक्स आर्ट ॲपच्या मदतीने बनावट पोलीस व्हेरिफिकेशन तयार केल्याची कबुली दिली.
तसेच, साळुंके याने यापूर्वीही अनेकांना अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे बनवून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. साळुंखे हा सुरक्षा रक्षकाचे काम करतो. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे करीत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या शॉर्टकट मार्गांनी पोलीस व्हेरिफिकेशन मिळवण्याचा प्रयत्न करू नये. कोणतेही पोलीस व्हेरिफिकेशन केवळ अधिकृत सरकारी प्रक्रियेद्वारेच करून घ्यावे, अन्यथा फसवणुकीचा धोका संभवतो. यासाठी पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. त्याद्वारे ऑनलाइन अर्ज करता येतो. यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून पुढील प्रक्रिया केली जाते. भाडेकरू तसेच नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन महत्त्वाचे मानले जाते.






