Amit Shah : “परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण खरी ताकद” – अमित शहा

Amit Shah – स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद असल्याचे मत केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी राजधानीत व्यक्त केले.
दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस डीडीए असिता ईस्ट पार्क, विकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी शहा बोलत होते.
शहा म्हणाले, गुजरात व महाराष्ट्र यांनी, कोणताही वाद न घालता, एकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, त्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले. दुसरीकडे गुजरात जेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केले, तेथे स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.
महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदर, रिफायनरी, एशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क, पहिली बुलेट ट्रेन, गिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे. वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत, असेही ते म्हणाले.





