Pune District : लाडका चहाही आता महागणार!
Pune District : शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या चहाच्या टपर्या आणि अमृततुल्य केंद्रांवर सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी असते. अनेक ग्राहक दिवसातून तीन-चार वेळा चहा घेतात. त्यामुळे चहाच्या दरात झालेली काही रुपयांची वाढदेखील महिन्याच्या खर्चात लक्षणीय भर घालणारी ठरणार आहे.

बेल्हे : महागाईची झळ आता सर्वसामान्यांच्या रोजच्या सवयीतील चहापर्यंत पोहोचली आहे. दूध आणि साखरेच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल, चहाच्या टपर्या तसेच अमृततुल्य केंद्रांवरील चहाचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी चहाच्या दरात प्रति कप 2 ते 5 रुपयांची वाढ झाल्याचे चित्र असून, त्यामुळे दिवसातून अनेक वेळा चहा घेणार्या ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी घेतलेली चहाची चुस्की असो, चहा हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, दूध आणि साखरेबरोबरच चहापत्ती व इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे चहा विक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या चहाच्या टपर्या आणि अमृततुल्य केंद्रांवर सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी असते. अनेक ग्राहक दिवसातून तीन-चार वेळा चहा घेतात. त्यामुळे चहाच्या दरात झालेली काही रुपयांची वाढदेखील महिन्याच्या खर्चात लक्षणीय भर घालणारी ठरणार आहे. दूध आणि साखरेच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम घरगुती चहावरही जाणवत आहे. त्याचबरोबर हॉटेल व चहाविक्रेत्यांना चहापत्ती, इंधन, पाणी, वीज तसेच इतर खर्चही वाढल्याने पूर्वीच्या दरात चहा विकणे कठीण होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
आधीच भाजीपाला, डाळी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात आता चहाच्या दरातही वाढ झाल्यास रोजंदारीवर काम करणारे कामगार, नोकरदार आणि अन्य सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक खर्चात आणखी वाढ होणार आहे. दरम्यान, काही हॉटेल व्यावसायिकांनी वाढत्या कच्च्या मालाच्या किमती लक्षात घेऊन चहाच्या दरात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.
कच्चा माल महागल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आहेत. दूध आणि साखरेच्या दरात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यासोबतच चहापत्ती आणि इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे चहा विक्रेत्यांचा नफा कमी झाला आहे. आमचा जुन्या दराने दहा रुपयांना चहा विकणे आता परवडत नाही. त्यामुळे काही ठिकाणी नाईलाजाने प्रति कप दोन ते पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आम्हीही दर वाढविण्याचा विचार करीत आहोत.
-मुस्तफा शेख, हॉटेल लक्ष्मी, आळेफाटा





