‘त्यावेळी वाजपेयी जरी पंतप्रधान असते तर त्यांनीही तेच केलं असतं…’; संजय राऊतांनी भाजपला सुनावले !

Sanjay Raut | The Emergency | Atal Bihari Vajpayee – काँग्रेस पक्षाने १९७५ मध्ये जी आणीबाणी आणली त्याचे जोरदार आणि खुले समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते. त्यावेळी तत्कालिन कॉंग्रेस सरकारपुढे जी स्थिती निर्माण झाली होती, त्या स्थितीत अटल बिहार वाजपेयी जरी पंतप्रधान असले असते तरी त्यांनीही आणीबाणी लागू केली असती असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी या वक्तव्याद्वारे आणीबाणीचे समर्थन केले आहे.
१९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ दरवर्षी २५ जून हा दिवस “संविधान हत्या दिन” म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा भारत सरकारने शुक्रवारी केली त्यावर प्रतिक्रीया देताना राऊत यांनी हे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की, त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने आणीबाणी लागू करण्यात आली होती.
आज भाजपकडे कोणतेही काम उरले नाही. ५० वर्षे झाली, आणि लोक आणीबाणीला विसरले आहेत. या देशात आणीबाणी का लादली गेली? काही लोकांना देशात अराजकता पसरवायची होती. रामलीला मैदानातून उघड घोषणा देण्यात आल्या, पोलिस आणि लष्कराने सरकारचे आदेश पाळू नयेत असे आवाहन केले गेले होते, यामुळे अटलबिहारी वाजपेयी जरी पंतप्रधान असते तर त्यांनीही आणिबाणी लादलीच असती असे राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करणारे अमित शहा यांना आणीबाणीबद्दल काहीही माहिती नाही त्यावेळी आरएसएसनेही आणीबाणीचे उघड समर्थन केले होते, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांनी १९७५ मध्ये आणीबाणीचे उघडपणे समर्थन करताना त्यांनी इंदिरा गांधींना उघडपणे पाठिंबा दिला.
त्यांचे मुंबईत स्वागत झाले. त्यांनी आणीबाणीचे समर्थन केले कारण देशातील अराजकता आटोक्यात आणण्याची गरज होती. त्यात गैर काय होते?… भाजपच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत जे घडले ते स्मरणात राहील, ते संविधानाचे रक्षणकर्ते नाहीत, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यावेळी संविधानाची हत्या झाली असे वाटत नव्हते. देशाच्या जनतेने आणीबाणीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या १० वर्षातील मोदी सरकारचा प्रत्येक दिवस संविधानाच्या हत्येसाठी चिन्हांकित होईल असे ते म्हणाले.





