Sanjay Raut | राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महापुराने शेतकऱ्यांची पिकं, घरं आणि स्वप्नं उद्ध्वस्त केली आहेत. बळीराजा संकटात सापडला असताना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे झालेल्या मोठ्या नुकसानानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास चालढकल होत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलं आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या गोट्या खेळतोय का? वक्तव्यावरुन देखील टीका केली होती. त्यावर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते, अशी खोचक टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. हसन मुश्रीफ काय म्हणाले? “विरोधी पक्षाचे काही लोक गर्दीमध्ये घुसून काहीतरी वक्तव्य करत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न याच माध्यमातून केला जात आहे. पण अजितदादांच्या मनामध्ये काहीही नसते, यामधून वेगळा अर्थ काढू नका. संजय राऊत यांच्या बद्दल न बोललेलेच बरे, राऊत यांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते. सुप्रियाताई, संजय राऊत , विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच आहे सरकारला पेचात पकडणे, पण शेतकऱ्यांना शांत करणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे काम आहे ते आम्ही करत आहे,” असे म्हणत मुश्रीफ यांनी विरोधकांना सुनावले आहे. पुढे मुश्रीफ यांनी सांगितले की, “गेल्या चार दिवसात अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भक्त आले आहेत. मी आज दर्शन घेऊन अंबाबाईला प्रार्थना केलीय, मराठवाड्यावर आलेलं महापुराचे संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची ताकद अंबाबाईने सरकारला द्यावी,” अशी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले. Sanjay Raut | ‘मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील’ याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे. त्याबाबतही मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. “कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार आणि केंद्र सरकार मिळून पूरग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कधी करायचे हे ठरले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील,” असेही मुश्रीफ म्हणाले. Sanjay Raut | हेही वाचा: “जाती सर्वेक्षणाच्या नावाखाली जनगणना ,” ; केंद्राच्या युक्तिवादावर कर्नाटक उच्च न्यायालय म्हणाले, “तरीही, आम्हाला ते योग्य वाटत नाही…”