Brydon Carse Handcuffed : इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! मागे लपून पाहत होता बेन स्टोक्स; नाईट क्लबमधील VIDEO मुळे खळबळ
Brydon Carse Handcuffed : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

England Pacer Brydon Carse Handcuffed In Derby Nightclub Video Viral : इंग्लंड क्रिकेट संघात नाईट क्लबमधील वाद आणि गैरवर्तनाचे प्रकरण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सला (Brydon Carse) पोलिसांनी बेड्या ठोकल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना डर्बी येथील एका नाईट क्लबबाहेर घडली. विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडिओमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) एका खांबाच्या मागे लपलेला दिसत असल्याने क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) तात्काळ उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
हातात बेड्या अन् पोलिसांचा गराडा; नाईट क्लबबाहेरील राडा कॅमेऱ्यात कैद –
‘द टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ब्रायडन कार्सच्या दोन्ही हातांत बेड्या दिसत असून त्याच्याभोवती तीन पोलीस अधिकारी उभे आहेत. कार्स यावेळी आपला सहकारी गोलंदाज मॅथ्यू पॉट्स याच्याशी बोलताना दिसतो. डरहॅम संघाने डर्बीशायरविरुद्ध मिळवलेल्या काउंटी चॅम्पियनशिप विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हे खेळाडू नाईट क्लबमध्ये गेले होते. प्राथमिक वृत्तानुसार, कार्सला काही काळ ताब्यात घेण्यात आले होते, मात्र नंतर कोणतीही औपचारिक तक्रार न नोंदवता त्याची सुटका करण्यात आली.
बेन स्टोक्सच्या उपस्थितीने खळबळ; ECB कडून चौकशीचे आदेश!
Durham bowler Brydon Carse, who is in England squad for second Test, was released without charge after a nightclub incident while celebrating victory over Derbyshire@willis_macp has the details ⤵️https://t.co/4YXyQWChe5 pic.twitter.com/zFKA3lgPVi
— Telegraph Cricket (@TeleCricket) August 23, 2026
या व्हिडिओमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निवृत्त झालेला माजी कर्णधार बेन स्टोक्सही घटनास्थळी एका खांबाजवळ लपताना दिसला. यावर प्रतिक्रिया देताना ईसीबीने अधिकृत पत्रक काढून, “डर्बीमध्ये रात्री घडलेल्या घटनेची आम्हाला माहिती मिळाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे,” असे स्पष्ट केले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघात कार्सचा समावेश असून, काउंटी सामना खेळण्यासाठी त्याला रिलीज करण्यात आले होते.
इंग्लिश क्रिकेटमधील ‘नाईट क्लब संस्कृती’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात –
इंग्लंडच्या खेळाडूंचे मैदानाबाहेरील गैरवर्तन आणि नाईट क्लबमधील वाद पहिल्यांदाच समोर आलेले नाहीत. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन यांचीही नाईट क्लब प्रकरणात चौकशी झाली होती. त्या पराभवानंतरच स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ॲशेस मालिका आणि परदेशी दौऱ्यांदरम्यान इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममधील अनिर्बंध मद्यपान संस्कृतीवर यापूर्वीही तीव्र टीका झाली असून, कार्सच्या या ताज्या प्रकरणामुळे इंग्लंड क्रिकेटची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.





