ICC Test Rankings 2024 : जो रूट पुन्हा अव्वलस्थानी, आपल्याच संघाच्या ‘या’ खेळाडूला टाकलं मागे…

ICC Test Rankings 2024 (Batting) : इंग्लंडचा फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या बाबतीत त्याने आपलाच सहकारी हॅरी ब्रुक याला पिछाडीवर टाकले आहे, ज्याची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आपल्या शानदार कारकिर्दीत 10व्यांदा अव्वल स्थान पटकावलं आहे, जिथे त्याच्या खात्यात 895 रेटिंग गुण आहेत. रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 32 आणि 54 धावांची खेळी खेळली होती, जिथे त्याच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध 423 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे, किवीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून ब्रूकला केवळ एकच धाव करता आली. याचा त्याला चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे शतक झळकावल्यानंतरही न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन 867 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी आजच संपली आहे, त्यामुळे या सामन्यातील कामगिरीचा ताज्या क्रमवारीत समावेश करण्यात आलेला नाही.
IND vs AUS 3rd Test : पावसाने केला खेळ खराब, 12 वर्षांनंतर गाब्बामध्ये पहिल्यादांच कसोटी अनिर्णित….
यशस्वीने चौथे स्थान ठेवले कायम…
यामुळेच भारताच्या यशस्वी जैस्वालने चौथे स्थान कायम ठेवले आहे, तर गाबामध्ये दमदार शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर कामगिरी करूनही पाचव्या स्थानावर आहे. ऋषभ पंत हा 724 रेटिंग गुणांसह टॉप 10 खेळाडूंच्या यादीत दहाव्या स्थानावर असलेला दुसरा भारतीय फलंदाज आहे.





