Joe Root Record : जो रूटचा ऐतिहासिक पराक्रम! महेला जयवर्धनेला मागे टाकत कसोटीत केला खास विक्रम

Joe Root broke Mahela Jayawardene record : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘ॲशेस २०२५-२६’ मालिकेतील अंतिम कसोटी सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने आपल्या बॅटने नवा इतिहास रचला आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा (५०+) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूटने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे.
कठीण प्रसंगात रूटने सावरली संघाची खिंड –
सिडनी कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या ५७ धावांत त्यांचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. अशा कठीण परिस्थितीत जो रूटने हॅरी ब्रूकच्या साथीने डावाची सूत्रे हाती घेतली. रूटने केवळ डाव सावरला नाही, तर पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येचा पायाही रचला. दुसऱ्या सत्रात आपले अर्धशतक पूर्ण करताच त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली.
महेला जयवर्धनेला टाकले मागे –
कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जो रूटची ही ६६ वी ‘५० प्लस’ (अर्धशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावा) खेळी ठरली. यासह त्याने महेला जयवर्धनेचा ६५ खेळींचा विक्रम मोडला आणि या यादीत तिसरे स्थान पटकावले.
कसोटीत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक वेळा ५०+ धावा करणारे खेळाडू –
| क्रमांक | खेळाडूचे नाव | देश | ५०+ धावसंख्या (खेळी) |
| १ | सचिन तेंडुलकर | भारत | १०२ |
| २ | जॅक कॅलिस | दक्षिण आफ्रिका | ७१ |
| ३ | जो रूट | इंग्लंड | ६६ |
| ४ | महेला जयवर्धने | श्रीलंका | ६५ |
| ५ | ब्रायन लारा | वेस्ट इंडिज | ५५ |
सचिन तेंडुलकरचा ‘तो’ महाविक्रम अजूनही दूरच –
जो रूट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेट विश्वात चर्चा आहे की, रूट लवकरच सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल. मात्र, अद्याप तो या विक्रमापासून काहीसा दूर आहे.
- जो रूट: १३,८४९ धावा
- सचिन तेंडुलकर: १५,९२१ धावा
सचिनचा विक्रम मोडण्यासाठी जो रूटला अजूनही २,०७२ धावांची गरज आहे. ॲशेस मालिकेपूर्वी रूट हा विक्रम लवकरच मोडेल अशी अपेक्षा होती, मात्र पहिल्या चार सामन्यांत त्याच्या बॅटमधून केवळ एकच शतक आले आहे. आता त्याच्या ७२ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवशी ३ बाद २११ धावा केल्या आहेत.





