AUS vs ENG : आऊट की नॉट आऊट? लाबुशेनच्या विकेटवरुन पेटला वाद, रुटने घेतलेल्या कॅचचा VIDEO व्हायरल

AUS vs ENG Marnus Labuschagne catch controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सनी पराभव करत मालिकेत विजयाचे खाते उघडले. मात्र, सामन्यात केवळ चेंडू आणि बॅटचा संघर्षच नाही, तर अंपायरिंगच्या निर्णयावरून मोठा वाद पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनच्या विकेट्सने सामन्यात मोठा गदारोळ झाला.
नेमकं काय घडलं?
दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना मार्नस लाबुशेनचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रूटने टिपला. रूटने झेल घेताच इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष सुरू केला, मात्र, लाबुशेनला हा झेल जमिनीला स्पर्श करून घेतल्याचा संशय आला. लाबुशेन आणि नॉन-स्ट्राईकला असलेल्या ट्रॅव्हिस हेडने मैदानातून जाण्यास नकार दिला, त्यामुळे निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवण्यात आला.
Fingers under the ball!!!
Wtf 😶🌫️#Ashes2025 #MarnusLabuschagne #Root pic.twitter.com/zOwgt4T2C7
— Santhosh Narayanan (@santyvarshan) December 27, 2025
तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत असलेल्या अहसान रझा यांनी विविध अँगलने रिप्ले तपासले. अनेक चाहत्यांना आणि कॅमेऱ्यातील काही दृश्यांमध्ये चेंडू जमिनीला घासल्याचा भास होत होता. तरीही, अंपायरने इंग्लंडच्या बाजूने निकाल देत लाबुशेनला बाद घोषित केले. या निर्णयावर लाबुशेनने उघड नाराजी व्यक्त केली, तर सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी अंपायरिंगवर कडाडून टीका केली आहे.
जस्टिन लँगर यांचे समर्थन –
What did you make of this catch? Out or not out?#Ashes | #DRSChallenge | @Westpac pic.twitter.com/pnWo2qt6qc
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2025
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर जस्टिन लँगर यांनी मात्र अंपायरच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘चॅनल सेवेन’शी बोलताना ते म्हणाले, “रिप्लेमध्ये स्पष्ट दिसतेय की झेल घेताना जो रूटची बोटं चेंडूच्या खाली होती. त्यामुळे तो नियमानुसार बादच आहे.”
ऑस्ट्रेलियात १४ वर्षांनंतर मिळवला कसोटी विजय –
ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत १४ वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १३२ धावांत गारद झाला. इंग्लंडच्या ब्रायडन कार्सने ४ तर बेन स्टोक्सने ३ विकेट्स घेत कांगारूंना रोखले.
हेही वाचा – IND W vs SL W : भारताने सलग तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत मालिका घातली खिशात
विजयासाठी मिळालेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्राउली (३७) आणि बेन डकेट (३४) यांनी ५१ धावांची भक्कम सलामी दिली. त्यानंतर जेकब बेथेलने संयमी खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. २०११ नंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ ठरली आहे.





