Sachin Tendulkar : सचिनने रूटबद्दल केलेली दोन भाकितं ठरली खरी, स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘मला माहित होतं की…’

सचिनने काय केली होती भविष्यवाणी?
विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकरने रूटच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याच्याबाबत केलेल्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. रूट इंग्लंडचा कर्णधार होईल आणि तो एक महान खेळाडू बनेल, असे सचिनने म्हटले होते, असे स्वत: सचिनने नुकतेच उघड केले आहे. सचिनने सोमवारी रेडिटवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना रूटबाबतच्या आपल्या पहिल्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले. एका चाहत्याने विचारले, “जो रूटबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? आता त्याने १३,००० कसोटी धावा पूर्ण केल्या असून तो तुमच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तुमच्याविरुद्ध पहिला सामना खेळला होता.”
सचिन काय म्हणाला?
यावर सचिन म्हणाला, “१३,००० धावांचा टप्पा गाठणे ही उल्लेखनीय कामगिरी आहे आणि रूट अजूनही दमदारपणे पुढे सरकतो आहे. मी त्याला २०१२ मध्ये नागपूर येथे त्याच्या पहिल्या टेस्ट सामन्यादरम्यान पाहिले तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, हा इंग्लंडचा भविष्यातील कर्णधार आहे. त्याचे खेळपट्टीचे आकलन आणि स्ट्राइक रोटेट करण्याची क्षमता यामुळे मी प्रभावित झालो होतो. मला तेव्हाच जाणवले होते की, हा महान खेळाडू होणार आहे.”
सचिन हा खेळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक –
रूटने डिसेंबर २०१२ मध्ये भारताविरुद्ध नागपूर येथे कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात नाबाद २० धावा केल्या होत्या. अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, ३४ वर्षीय रूट पुढील काही वर्षांत सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो. मात्र, याबाबत रूटने गेल्या महिन्यात ‘बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल’ला सांगितले, “हा असा काही टप्पा नाही ज्यावर मी लक्ष केंद्रित करतो. अशा गोष्टी खेळताना आपोआप घडतात.” रूटने सचिनबद्दल आपले मत ‘सोनी लिव्ह’वर व्यक्त करताना म्हटले, “सचिन हा खेळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने जे दबाव हाताळले आणि जे यश मिळवले, ते अविश्वसनीय आहे.”
जो रुटने सांगितली बालपणीची आठवण –
आपल्या पदार्पण सामन्याविषयी आठवण सांगताना रूट म्हणाला, “लहानपणी ज्या खेळाडूला तुम्ही खेळताना पाहिले, ज्याच्यासारखे खेळण्याची इच्छा होती, त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे हा अविस्मरणीय अनुभव होता. सचिनने माझ्या जन्मापूर्वीच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यांच्याविरुद्ध खेळणे हा एक अप्रतिम अनुभव होता.” रूटच्या या प्रवासात त्याने सचिनच्या भविष्यवाणीला सार्थ ठरवले आहे आणि क्रिकेटविश्वात आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहीत आहे.





