रांजणी – पुणे पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना पाणी वापर प्रकल्प हस्तांतर करणे, पाणीपट्टी वसुली, सिंचन क्षेत्रात वाढ करणे आदी कामांची दखल घेऊन जलसंपदा विभागाने पुण्याचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांचा नुकताच गौरव केला. प्रवीण कोल्हे 2017-2018 साली कार्यकारी अभियंता होते. त्यावेळी जलसंपदा विभागातील प्रकल्प व अनेक योजना राबविताना अभियंत्यांचे तांत्रिक व प्रशासकीय कौशल्य पणाला लागते. अशावेळी विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. विकासात ही बाब महत्त्वाचा वाटा असते. अभियंत्यांच्या उत्कृष्ट कामांचे कौतुक व्हावे आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी उत्कृष्ट अभियंत्यांचा वैयक्तिक प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाते. प्रवीण कोल्हे 2007 सालापासून शासनाच्या जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेल्या कोल्हेंनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. त्यांच्या कार्याचा सचिव आर. आर. पवार यांनी गौरव केला. विशेषतः जलसंपदा विभागात काम करत असताना अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सरकारच्या पैशांची बचत करून अनेक महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण योजना मार्गी लावल्या. त्यांच्या एकूण कामाची शासनाने दखल घेतली आणि त्यांना सन्मानित केले. सध्या प्रविण कोल्हे हे पुणे जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत आहेत. जलसंपदा विभागाकडून गौरविण्यात आलेल्या अभियंत्यांमध्ये मंत्रालय उपसचिव र. रा. शुक्ला, राजेश मोरे (नाशिक), राम हजारे (बुलडाणा) यांचा समावेश आहे. दरम्यान, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांना शासनाने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड, चिन्नास्वामी बिरासदार, एकनाथराव पाटील तसेच मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, विलास रजपूत आदींनी अभिनंदन केले.