Pune District : पावसाच्या दडीने बटाटा पीक धोक्यात
Pune District : या भागात दरवर्षी पावसाळी बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर, रांजणी, थोरांदळे आणि शिरदाळे परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने पावसाळी बटाटा पीक सुकू लागले आहे. नागापूर, रांजणी व थोरांदळे परिसरात पीक फुलोऱ्यात असतानाच जमिनीतील ओलावा संपल्याने कंदांची वाढ खुंटली आहे. तर दुर्गम व डोंगराळ भागातील शिरदाळे परिसरात पाऊस नसल्याने बटाट्याची पाने पार सुकून करपू लागली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
या भागात दरवर्षी पावसाळी बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर हजारो रुपये खर्च करून लागवड केली होती. सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने पीक जोमात आले; मात्र आता ऐन गरजेच्या वेळी पावसाने दडी मारल्याने पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.
कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी
पावसाअभावी बटाट्याचे उत्पादन घटणार असल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजी चौधरी, राघू रनपिसे, सचिन तांबे, संदीप मिंडे, सिद्धार्थ तांबे आणि मयूर सरडे यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी कृषी व महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.
बटाटा पीक सध्या फुलोऱ्यात असून कंद फुगण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यावश्यक आहे. मात्र, महिनाभरापासून पाऊस नसल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तातडीने दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल.
-दौलत भोर, बटाटा उत्पादक शेतकरी, नागापूर.





