Pune District : वळसे यांच्या भूमिकेला शेतकऱ्यांचा पाठिंबा
Pune District : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयात जनमित्र स्व. दिनकरराव आवटे यांच्या ३९व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

रांजणी : डिंभे धरणातून निघणाऱ्या बोगद्याच्या कामाला माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला असून, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा हा प्रकार आहे. वळसे पाटील यांच्या भूमिकेला जुन्नर तालुक्यातील शेतकरी खंबीरपणे पाठिंबा देतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे यांनी व्यक्त केला.
खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयात जनमित्र स्व. दिनकरराव आवटे यांच्या ३९व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिल्पकार शरद कापूसकर, वरिष्ठ पत्रकार रमेश जाधव, इंजिनीयर सुहास जोशी, हभप सुरेखा शिंदे शास्त्रज्ञ निलेश पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब इंदोरे, कृषी सल्लागार शिवाजी आवटे यांना भूमिपुत्र पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शंभर टक्के निकाल लावणाऱ्या तालुक्यातील ३३ शाळांचा आणि तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्व. दिनकरराव आवटे मित्रमंडळाचे सामाजिक व शैक्षणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. गेले 39 वर्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं काम हे अनेकांना प्रेरणा देणारे असल्याचे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रशासक सरपंच सविता डोके, माजी सरपंच अनिल डोके, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील वळसे पाटील, अॅड. राजेंद्र बेंडे पाटील, सरपंच सुजाता चासकर उपस्थित होते.
लेखक व निवृत्त प्राचार्य लक्ष्मण वाळुंज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन सुनील वाळुंज डॉ. अमित काळे, अजय आवटे, महेश भालेराव याकूब इनामदार व किसन आवटे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष भरत चिखले यांनी प्रास्ताविक केले. सतीश जाधव व आत्माराम जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राचार्य एल. डी. पगार यांनी आभार मानले.





