Pune District : लाखणगावात विवेक वळसे-पाटील यांचा ठराव
Pune District : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, विविध सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे.

रांजणी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी सभासद सहकारी संस्थांकडून मतदार प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते विवेक वळसे-पाटील यांच्या नावाचा प्रतिनिधी म्हणून ठराव मंजूर झाला आहे.
लाखणगाव सोसायटीतील या निर्णयामुळे पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पकड कायम ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विशेषतः या प्रक्रियेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रतिनिधी निवडीसाठी प्रयत्न सुरू असताना विवेक वळसे-पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर झाल्याने शिवसेनेला राजकीय धक्का बसल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू झाली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, विविध सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे. पीडीसीसी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी निवडणूक होणार असून, विकास सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक निवडला जातो.
आंबेगाव तालुक्यात पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधी निवडीकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे लाखणगाव सोसायटीतील ठरावाकडेही आगामी निवडणुकीतील राजकीय शक्तीपरीक्षणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.
विवेक वळसे-पाटील हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या नावाला सोसायटीकडून प्रतिनिधित्वासाठी मंजुरी मिळाल्याने आंबेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध सहकारी सोसायट्यांमध्ये प्रतिनिधी निवडीवरून राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. काही ठिकाणी प्रतिनिधी निवडीवरून वाद आणि आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत.
सुत्र विवेक वळसे-पाटील यांच्याकडे जाणार?
लाखणगाव येथील ठरावामुळे आगामी काळात आंबेगाव तालुक्यात पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे राजकीय गणित कोणत्या दिशेने जाते, याकडे सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आतापर्यंत पुणे जिल्हा बँकेत आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व केले असून आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाची सुत्रे विवेक वळसे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.





