ENG vs PAK 2nd Test (Day 2) : पाकिस्तानचं अखेरच्या सत्रात कमबॅक, डकेटच्या शतकानंतरही इंग्लंड अजूनही 127 धावांनी पिछाडीवर…

ENG vs PAK 2nd Test (Day 2) : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मुलतानमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानच्या 366 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 6 विकेट गमावताना 239 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जेमी स्मिथ 12 धावांवर तर ब्रेडन कार्स दोन धावांवर नाबाद माघारी परतले.
एकवेळ इंग्लंडची धावसंख्या दोन विकेट्सवर 211 धावा होती. पण त्यानंतर पाकिस्तानने पुनरागमन केले आणि 6 बाद 225 धावा अशी इंग्लंडची स्थिती केली. इंग्लंड सध्या पाकिस्तानपेक्षा 127 धावांनी मागे आहे. पाकिस्तानकडून साजिद खानने चार विकेट घेतल्या. तर नोमान अलीने दोन इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनवले.
Pakistan close day two on a high with Sajid and Noman shining bright 🏏
England are 239-6, trailing by 127 runs.
Scorecard: https://t.co/sDVJBTiJUN#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/qU7IHfeX8b
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 16, 2024
इंग्लंडकडून बेन डकेटने झळकावले शतक…
दुसऱ्या दिवशी पाकिस्तानला 366 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने बेझबॉल शैलीत खेळण्यास सुरुवात केली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. क्रॉली 36 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा करून बाद झाला. यानंतर ओली पोपही 37 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 29 धावा करून माघारी परतला. यानंतर बेन डकेटने आपल्या आक्रमक शैलीत खेळ सुरूच ठेवला. त्याने केवळ 129 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 16 चौकार आले. बेन डकेट याचे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक ठरले.
अखेरच्या सत्रात पाकचं कमबॅक…
एकवेळ हा सामना इंग्लंडच्या हातात आहे आणि पाकिस्तानचा संघ खूप मागे पडला आहे, असे वाटत होते. धावसंख्या 211 होती आणि बेन डकेट आणि जो रूट क्रीजवर होते. मात्र दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पाकिस्तानी गोलंदाजांनी आपल्या संघाला दमदार पुनरागमन करून दिले. यादरम्यान जो रूट 54 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. पहिल्या कसोटीत त्रिशतक झळकावणारा हॅरी ब्रूक 9 धावा करून बाद झाला तर कर्णधार बनलेला स्टोक्स केवळ एक धाव काढता आली. सध्यातरी हा सामना बरोबरीतआहे. तिसरा दिवस खूप रोमांचक असणार आहे.
ENG vs PAK 2nd Test Day 1 : पदार्पणाच्या कसोटीत गुलामचे शतक; दिवसअखेर पाकच्या 5 बाद 259 धावा…
पाकचा पहिला डाव 366 धावांवर संपुष्टात…
पाकिस्तानने 5 बाद 259 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र इंग्लंडने 107 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेत पाकिस्तानचा पहिल डाव 366 धावांवर गुंडाळला. पाकिस्तानकडून कामरान गुलाम याने सर्वाधिक 118 धावा केल्या. तर सॅम अयुबने 77 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकालाही 50 पार मजल मारता आली नाही. मोहम्मद रिझवानने 41, आमेर जमालने 37, सलमान अली आगाने 31 आणि नोमान अलीने 32 धावा केल्या. नोमान आणि आमेर यांनी 9व्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली नसती तर पाकिस्तानचा संघ 320 धावांच्या आतच गारद झाला असता. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 4 तर ब्रायडन कार्सने 3 गडी बाद केले. मॅथ्यू पॉट्सने 2 विकेट्स घेतल्या. तर शोएब बशीरने 1 विकेट घेतली.





