ENG vs PAK : दुसऱ्या कसोटीसाठी पाकने सुध्दा केली Playing XI ची घोषणा, संघात अनेक मोठे बदल…

ENG vs PAK 2nd Test (Pakistan’s playing XI) : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) उद्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर पाकिस्तानने आपल्या संघात अनेक मोठे बदल केले आहेत. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
माजी कर्णधार बाबर आझम, स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून वगळण्यात आले आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर तिघांनाही वगळण्यात आले असून अनेक नवीन खेळाडूंचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या संघात एकूण 4 बदल पाहायला मिळाले आहेत. बाबर आझमच्या जागी कामरान गुलामचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कामरान गुलामने पाकिस्तानकडून आतापर्यंत फक्त 1 एकदिवसीय सामना खेळला आहे. म्हणजेच या सामन्यातून तो कसोटी पदार्पण करेल.
शाहीन शाह आफ्रिदीऐवजी नोमान अलीचा गोलंदाजीत समावेश करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज साजिद खान आणि जाहिद मेहमूद यांनाही प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे.
The men’s national selection committee has confirmed Pakistan’s playing XI for the second Test against England, starting in Multan on Tuesday, 15 October.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/WzLnC0lfYQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन – अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
अशा प्रकारे इंग्लंडने जिंकली पहिली कसोटी
मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजय नोंदवला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 556 धावा केल्या होत्या. या काळात कर्णधार शान मसूद, आगा सलमान आणि अब्दुल्ला शफीक यांनी शतकी खेळी खेळली होती. त्यानंतर प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 823 धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून त्रिशतक (317) झळकावले. याशिवाय जो रूटने 262 धावांची खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला आणि अवघ्या 220 धावांवर सर्वबाद झाला. अशा प्रकारे इंग्लिश संघाने एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला.





