ENG vs PAK 2nd Test (Day 3) : दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत, विजयासाठी इंग्लंडला 261 धावांची तर पाकला 8 विकेट्सची गरज….

ENG vs PAK 2nd Test (Day 3) : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मुलतानमध्ये खेळली जात असलेली दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. ओली पोप 21 आणि जो रुट 12 धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी पुढील 2 दिवसांत आणखी 261 धावांची गरज आहे तर पाकिस्तानला 8 विकेट्सची गरज आहे.
पाकिस्तान वि. इंग्लंड सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी लागण्याची शक्यता आहे. एकीकडे पाहुण्या संघाकडे तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला दुसर्या सामन्यात विजय मिळवून पहिल्या पराभवाचा बदला घेत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याची संधी आहे. आता यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यां क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे.
तिसऱ्या दिवशी पडल्या 16 विकेट…
मुलतान कसोटीचा तिसरा दिवसही गोलंदाजांच्या नावावर होता. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावातील 4 विकेट गमावल्या. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव संपुष्टात आला आणि त्यानंतर इंग्लंडनेही त्यांच्या दुसऱ्या डावात 2 विकेट्स गमावल्या आहेत. अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी एकूण 16 विकेट पडल्या. फिरकीपटूंनी 16 पैकी 13 बळी घेतले.
तिसऱ्या दिवशी काय-काय झालं…
कामरान गुलामच्या 118 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 366 धावांवर आटोपला होता. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला 6 बाद 239 धावांपासून सुरुवात केली. मात्र इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 4 विकेट्स गमावून 52 धावाच जोडता आल्या. इंग्लंडचा पहिला डाव अशाप्रकारे 291 वर आटोपला. त्यामुळे पाकिस्तानला 75 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डेकट याने सर्वाधिक 114 धावांची खेळी केली तर पाकिस्तानकडून साजिद खान याने सर्वाधिक 7 तर नोमान अलीने 3 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात पाक 221 धावांवरच गारद….
साजिद खाननंतर इंग्लंडच्या शोएब बशीर आणि जॅक लीच या जोडीनेही खेळपट्टीच्या मदतीचा पुरेपूर फायदा घेतला. यजमान संघ दुसऱ्या डावात केवळ 221 धावा करून सर्वबाद झाला. आघा सलमानने संघाकडून सर्वाधिक 63 धावा केल्या. तर सौद शकीलने 31, कामरान गुलामने 26 , मोहम्मद रिझवानने 23 आणि साजिद खानने 22 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जॅक लिचने 3, शोएब बशीरने 4, ब्रेडन कार्सने 2 आणि मॅथ्यू पॉट्सने 1 बळी घेतला.
Pakistan’s star spin duo Noman and Sajid removed the 🏴 openers in the final hour ☄️
We’ll be back tomorrow for the Day 4 action from Multan 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/8YAqYBRmNb
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 17, 2024
इंग्लंड विजयापासून 261 धावां दूर….
पाकिस्तानने पहिल्या डावातील 75 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 221 धावांसह इंग्लंडसमोर विजयासाठी 297 धावांचं लक्ष ठेवलं. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात इंग्लंडची वाईट सुरुवात झाली. पहिल्या डावात शतक झळकावणारा बेन डकेट याला भोपळाही फोडता आला नाही. तर झॅक क्रॉली 3 धावांवर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती ही 2 बाद 11 अशी झाली होती. मात्र त्यानंतर जो रुट (12) आणि ओली पोप (21) या दोघांनी संयमाने खेळ पुढे नेला व आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 11 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 36 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पाककडून दुसऱ्या डावात साजीद खान आणि नोमान अली या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.





