प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास प्रोत्साहन द्या – अजित पवार

आंबेगाव बुद्रुक : राज्यशासनाच्या वतीने नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरांचे प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास प्रोत्साहन द्यावे आम्ही शासनाच्या वतीने सार्वजनिक वाहतुकीसाठी अशा जास्तीत जास्त गाड्या देणार आहोत.
या भागाचा विकास झाला असून कात्रज मेट्रोसाठी राज्य सरकारकडून पूर्ण प्रयत्न करणार येतील कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. मात्र, केंद्राने सुद्धा प्रयत्न करायला हवेत. केंद्राने निधी तत्काळ उपलब्ध करून देत सहकार्य करायला हवे, म्हणजे कात्रज मेट्रो लवकर होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले. नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या प्रयत्नातून कात्रज डेअरी ते वंडरसिटी सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ पथ या २५ वर्षे प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, अनेक दिवसानंतर मी या परिसरात आलेलो आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या रस्त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवराज बेलदरे आणि सर्वांचे अभिनंदन! कात्रज दूध उत्पादक संघाच्या सहकाऱ्यांसोबत बोलून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. ज्यावेळी ही जागा डेअरीला दिली.
त्यावेळी नागरीकरण कमी होते आता वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या कररुपी पैशांचा वापर व्यवस्थित करून अशी दर्जेदार कामे करायला हवीत. आपला परिसर स्वच्छ ठेवा कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा. केवळ महापालिका, केंद्र सरकार, राज्य सरकार काही करू शकत नाही. लोकांचेही सहाय्य हवे. कृपा करून स्वतः कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावा. उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
त्याचवेळी कात्रजला आणखी कशा पायाभूत सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच वाढत्या नागरिकिकरणाच्या पार्श्वभूमीवर पाणी, रस्ते, वीज, उद्याने क्रीडांगणे, स्मशानभूमी अशा मूलभूत सुविधांवर काम करण्यात येईल. या सुविधा देण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास पवार यांनी दिला.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, नगरसेवक विशाल तांबे, प्रकाश कदम, नगरसेविका अमृता बाबर, स्मिता कोंढरे, अश्विनी भागवत, आप्पा रेणूसे, अनिल कोंढरे, दिनेश कोंढरे, नानासाहेब बेलदरे आदीसह नागरिक व महिला उपस्थित होते.
२५ वर्षापूर्वी विकास आराखड्यात असलेल्या या रस्त्याला अनेक अडचणींमुळे ग्रहण लागले होते. मी नगरसेवक झाल्यानंतर सुप्रिया सुळे व अजितदादा पवार यांचे मुळे या रस्त्याचे विकासाला गती मिळून पूर्ण झाल्याने आज लोकार्पण केला आहे. या बरोबरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण आणि ४५ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले असून नागरिकांचे विकास कामासाठी सदैव तत्पर आहे. –
युवराज बेलदरे, नगरसेवक पुणे मनपा





