वीज वापर मोबाइलवर समजणार

पुणे – महावितरण वीजग्राहकांना टीओडी वीजमीटर मोफत बसवत असून, पुणे विभागात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक ग्राहकांना मीटर बसविले आहे. त्यामुळे झालेला वीजवापर मोबाइलवर केव्हाही, कधीही तपासता येणार आहे. त्यासाठी ॲप तयार केले असून, त्याद्वारे अचूक वीजबिल मिळणार असल्याने ग्राहकांनी मीटर बसविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजमीटरचे रीडिंग घेण्यासाठी लागणारा वेळ, त्यातील मानवी चुका टाळण्यासाठी टीओडी मीटर बसविले जात आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. यात ग्राहकाला झालेला वीजवापर मोबाइलमधून केंव्हाही व कोठूनही तपासता येणार आहे. त्यासाठी ‘महाविद्युत हे ॲप विकसित केले आहे.
नवीन मीटरमुळे महावितरणला रिडींग घेण्यासाठी कोणी बाह्यव्यक्ती, कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे ठरलेल्या तारखेला काही क्षणांत मीटर रीडिंग ऑनलाईन मिळते.
तसेच सौरऊर्जेमुळे महावितरणला स्वस्त विजेची उपलब्धता दिवसा अधिक होत आहे. ही स्वस्त वीज ग्राहकांना दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. आता दिवसाच्या वीज वापरावर सूट दिली जाणार आहे.
‘काही ठिकाणी नवीन मीटरला अनाठायी विरोध होत आहे. ज्यांना मीटरवर शंका आहे, त्यांनी महावितरणशी संलग्न मीटर चाचणी कक्षात प्रत्यक्ष पडताळणी करावी. येथे जुन्या व नवीन मीटरवर समान वीजभार टाकून ग्राहकाला मीटर तपासून देण्याची सोय आहे. त्यामुळे ऐकीव, सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये.’ – सुनील काकडे
मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल.





