पुणे: चांदणी चौकात रिक्षा दुभाजकावर आदळली; चालकाचा मृत्यू

पुणे : भरधाव रिक्षा दूभाजकावर आदळून रिक्षाचालक मृत्युमुखी पडल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर चांदणी चाैकात सोमवारी मध्यरात्री घडली. गणेश कोळस्कर (रा. धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
रिक्षाचालक कोळस्कर हा बाह्यवळण मार्गावरुन मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगात निघाला होता. चांदणी चौकाजवळ भरधाव रिक्षा दुभाजकावर आदळली. अपघातात रिक्षाचा चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षात अडकलेल्या रिक्षाचालक कोळस्कर याला बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेतील कोळस्करला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्यचाी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले.





