Electricity Bill: वीज बिल थेट दुप्पट! मे महिन्याच्या बिलाने उडवली पुणेकरांची झोप; पाहा काय आहे कारण
Electricity Bill: ठाणे, कल्याण, बदलापूरसह पुणे परिसरात वाढल्या तक्रारी; महावितरणने तांत्रिक अहवाल सादर करत स्पष्ट केली वाढीव बिलाची ५ मुख्य कारणे.

Electricity Bill – हवामानातील बदल आणि कडक उन्हाळ्याचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे. मे २०२५ च्या तुलनेत यंदा मे २०२६ मध्ये तापमान अधिक होते. या तापमानवाढीमुळे घरगुती ग्राहकांचा वीज वापर वाढला असून, मासिक वीज बिले थेट दुप्पट आली आहेत. जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर होत आहे.
विशेष म्हणजे महावितरणने केलेल्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि पुणे परिसरातील वीज बिलांच्या तक्रारींनंतर महावितरणने हा अभ्यास केला. अहवालानुसार, मे २०२५ मध्ये सरासरी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस होते, जे यंदा मे २०२६ मध्ये तब्बल ४३ अंशांवर पोहोचले. गेल्या वर्षी मे महिन्यात ठाणे परिसरात सुमारे २००.६ मिमी पाऊस झाल्याने महिन्याच्या उत्तरार्धात नैसर्गिक थंडावा मिळाला होता.
यंदा मे महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने आणि आर्द्रता वाढल्याने नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. या उष्णतेमुळे एअर कंडिशनर (एसी), पंखे आणि रेफ्रिजरेटर या उपकरणांचा वापर चोवीस तास करावा लागला. अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे मध्यमवर्गीय ग्राहकांचा वीज वापर ३०० युनिट्सच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार, वापराच्या तीव्रतेनुसार वेगवेगळे वीजदर (स्लॅब) निश्चित आहेत.
सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयांचा वापर ३०० युनिट्सच्या आत असल्याने त्यांना सवलतीचा दर लागू होतो. मात्र, यंदा अतिवापरामुळे ग्राहक थेट उच्च दराच्या वीज स्लॅबमध्ये गेले. परिणामी, केवळ युनिट्सच वाढले नाहीत, तर उच्च स्लॅबच्या महागड्या दरामुळे बिलात अनपेक्षित मोठी वाढ झाली. उदाहरणादाखल, १ बीएचके फ्लॅट असलेल्या कुटुंबाचा वीज वापर २७० युनिट्सवरून ४१५ युनिट्सवर गेला, ज्यामुळे त्यांचे बिल २५०० रुपयांवरून थेट ५००० रुपयांवर पोहोचले.
तसेच, २ बीएचके फ्लॅटमधील कुटुंबाचा वापर ४२५ युनिट्सवरून ६५५ युनिट्स झाल्याने बिल साडेचार हजारांवरून थेट आठ हजार रुपये झाले, असे अहवालातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, महावितरणचा हा अभ्यास तांत्रिकदृष्ट्या बरोबर असेलही, पण यामुळे सर्वसामान्यांचे कोलमडलेले बजेट कसे सावरणार? असा प्रश्न आहे.
वाढीव वीज बिलामागील कारणे
१. सातत्याने जास्त तापमान
२. वाढलेली आर्द्रता
३. पावसाअभावी थंडाव्याचा अभाव
४. एसी, इतर शीतकरण उपकरणांचा वाढलेला वापर
५. उच्च दराच्या वीज स्लॅबमध्ये स्थलांतर






