Open Electrical Boxes: रावेतमध्ये मृत्यूचा सापळा? पंपिंग स्टेशनजवळ महावितरणचा जीवघेणा कारभार
Open Electrical Boxes: रोज शेकडो नागरिक आणि लहान मुलांची ये-जा असणाऱ्या मार्गावर प्रशासनाचा हलगर्जीपणा; उघड्या पेट्या तातडीने बंद करण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी.

Open Electrical Boxes – रावेत पंपिंग स्टेशन परिसरातील रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या विद्युत दिव्यांच्या खांबांच्या जोडणी (जंक्शन बॉक्स) पेट्यांची झाकणे उघडी असल्याचे समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या परिसरातून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी लहान मुले तसेच परिसरातील रहिवासी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशा ठिकाणी विद्युत जोडणी पेट्यांची झाकणे उघडी असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजेच पावसाळ्यात या पेट्यांमध्ये पाणी साचल्यास किंवा विद्युत प्रवाह सुरू असल्यास परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.
याशिवाय, उघड्या पेट्यांमध्ये उंदीर, साप किंवा इतर सरपटणारे प्राणी शिरण्याची शक्यता असून, त्यामुळे विद्युत यंत्रणेत बिघाड होणे, शॉर्टसर्किट होणे किंवा रस्त्यावरील दिव्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याचाही धोका आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक सुविधांवरही परिणाम होऊ शकतो.
स्थानिक रहिवासी सचिन सिद्धे यांनी सांगितले की, “या जोडणी पेट्यांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्यास ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा लहान मुलाचा जीव धोक्यात येण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने सर्व उघडी झाकणे बंद करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच नियमित तपासणी करून अशा त्रुटी पुन्हा उद्भवणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.”
नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून सर्व उघड्या जोडणी पेट्या सुरक्षितपणे बंद कराव्यात, खराब झालेली झाकणे बदलून आवश्यक दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या धोकादायक परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी नियमित देखभाल व तपासणीची प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी मागणी केली आहे.





