Crime News : विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; ३० किलो तांब्याची कॉइल लंपास
Crime News : विशेष म्हणजे, चोरट्यांनी रोहित्रातील ऑइल जमिनीवर सांडवून त्यातील मौल्यवान तांब्याची कॉइल काढून नेली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्हावरे : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, चव्हाणवाडी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्याने विद्युत रोहित्र फोडून त्यातील सुमारे ३० किलो वजनाची तांब्याची कॉइल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
विशेष म्हणजे, चोरट्यांनी रोहित्रातील ऑइल जमिनीवर सांडवून त्यातील मौल्यवान तांब्याची कॉइल काढून नेली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी गावच्या हद्दीतील चाळक महाराज मंदिराशेजारी, शेतजमीन गट क्रमांक ३८/१ मध्ये थेऊरकर यांच्या मालकीचे ६३ केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहे. दि ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री एक ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या रोहित्राला लक्ष्य केले. रोहित्रातील ऑइल सांडवून त्यामधील अंदाजे ३० किलो वजनाची आणि १८ हजार रुपये किमतीची तांब्याची कॉइल चोरून नेली.
या प्रकरणी वायरमन सत्यम ज्ञानोबा बोळेगावे (वय २५,रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलमाप्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित्र चोरीमुळे शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर
विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमुळे केवळ महावितरणचे आर्थिक नुकसान होत नाही, तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर ते पुन्हा बसविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे आधीच शेतीच्या विविध संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना अशा घटनांचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, रोहित्रातील कॉइल काढण्यासाठी चोरट्यांनी केलेली तोडफोड पाहता, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती घेणे, तसेच संबंधित भागातील गस्त वाढविणे आवश्यक आहे. विद्युत रोहित्रे वारंवार चोरीला जात असतील, तर या घटनांमागील चोरट्यांची साखळी शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.





