लोणी काळभोर – गेली १३ वर्षापासून बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwant Sahakari Sugar Factory) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार दि. २७ मार्च रोजी होणार आहे.
या कारखान्याची निवडणूक नुकतीच ९ मार्च रोजी पार पडली आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यानंतर आता कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड नवनिर्वाचित संचालकातून केली जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याची सूत्रे नवीन संचालक मंडळाच्या हाती दिली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी शीतल पाटील यांनी नवनियुक्त संचालक मंडळाला अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीची कार्यक्रम पत्रिका पाठवली आहे.
यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने २१ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय संपादन केला होता.
निवडून आलेल्या संचालक मंडळातील पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांचे बंधू सुभाष जगताप व कारखान्यासाठी गेली अनेक वर्षे संघर्षाच्या भूमिकेत असणारे माजी संचालक पांडुरंग काळे यांचे चिरंजीव मोरेश्वर काळे हे दोघे या पदांच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे.