प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. ६) पिंपरखेड येथे रोहन बोंबे याच्या घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी वनविभागाला अत्यंत कठोर आणि स्पष्ट शब्दांत निर्देश दिले.शिंदे यांनी पिंपरखेड येथे रोहन बोंबे आणि शिवन्या यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुलाला गमावल्यामुळे रोहनचे वडील विलास बोंबे यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर हंबरडा फोडत आक्रोश केला आणि ‘माझ्या मुलासारखे कोणाचेही जीव जाऊ नयेत,’ अशी कळकळीची विनंती केली. यावर शिंदे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत, “पीडित कुटुंबियांच्या पाठीशी सरकार आहे,” असे सांगितले. तसेच, बिबट्यांचा वावर असलेल्या भागात तातडीने विशेष मोहीम राबवून परिसर बिबटमुक्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा वापरण्याची जबाबदारी त्यांनी वनविभागाला दिली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतरस्त्यांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार शरद सोनवणे, देवदत्त निकम, देविदास दरेकर, रमेश येवले, सचिन बांगर, सरपंच राजेंद्र दाभाडे, सरपंच दत्तात्रय जोरी तसेच जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, प्रांतधिकारी पुनम आहिरे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिंदे कठोर आदेश.. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बिबट प्रवण भागात यापुढे एकही हल्ला आणि एकही मृत्यू नको असे स्पष्ट केले. “उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा वापरा आणि हा संपूर्ण परिसर तातडीने बिबटमुक्त करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी वनविभागाला दिले. कोणताही हलगर्जीपणा न होऊ देण्याच्या सूचनाही त्यांनी केली.