Rahul Gandhi | Congress – काँग्रेस सुरुवातीपासूनच केंद्र सरकारच्या मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर)ला विरोध करत आहे. आता, काँग्रेस एसआयआर विरोधात दिल्लीत रॅली काढण्याचा विचार करत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रामलीला मैदानावर ही रॅली होणार आहे. एसआयआरवरील काँग्रेसच्या बैठकीनंतर संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या रॅलीची घोषणा केली. एसआयआर राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांसोबत एक बैठक झाली होती. मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) सुरू असलेल्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी, राज्य युनिट प्रमुख, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि सचिवांसह आढावा बैठक घेतली. इंदिरा भवन येथील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा अलिकडच्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आणि त्यांनी कथित मतचोरीच्या विरोधात मोहीम सुरू केली. काँग्रेसचा आरोप आहे की, केंद्रिय निवडणूक आयोग भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी काम करत आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वांना याबद्दल इशारा दिला आहे. केसी वेणुगोपाल म्हणाले की, निवडणूक आयोग लोकशाही आणि विरोधी पक्षांना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर खर्गे म्हणाले की, काँग्रेस खऱ्या मतदारांना काढून टाकण्याचा किंवा बनावट मतदारांना समाविष्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न उघड करेल. ते लोकशाहीच्या सुरक्षिततेला क्षीण होऊ देणार नाही. निवडणूक आयोगाने हे सिद्ध करावे की ते भाजपच्या सावलीत काम करत नाही. भाजप एसआयआरचा शस्त्र म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर आयोगाने याकडे दुर्लक्ष केले तर तेही या कटात सहभागी असल्याचे मानले जाईल.