Ek Din Poster: आमिर खानचा मुलगा जुनैद याच्या ‘एक दिन’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; साई पल्लवीसोबत रोमँटिक अंदाज

Ek Din Poster : आमिर खानचा मुलगा जुनैद खान याच्या ‘एक दिन’ या चित्रपटाचे पोस्टर अखेर प्रदर्शित झाले आहे. ‘महाराज’ आणि ‘लवयापा’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या जुनैदचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी आमिर खान प्रोडक्शन्सकडून ‘एक दिन’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या पोस्टरमध्ये जुनैद आणि साई पल्लवी बर्फवृष्टीत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीत दोघेही एकत्र आईस्क्रीम खाताना दिसत असून पोस्टरवर, “जिंदगीच्या गोंधळात, प्रेम तुम्हाला शोधून काढेल… एक दिन” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
निर्मात्यांनी पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘एक दिन’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचा पहिला टीझर १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केलं असून, कथा स्नेहा देसाई आणि स्पनंद मिश्रा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते मन्सूर खान, आमिर खान आणि अपर्णा पुरोहित आहेत. संगीत राम संपत यांचं असून गीत इरशाद कामिल यांनी लिहिली आहेत.
जुनैद खान याआधी ‘महाराज’ आणि ‘लवयापा’ या चित्रपटांत दिसला आहे. तर साई पल्लवी ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री असून ती लवकरच रणबीर कपूरसोबत ‘रामायण’ या चित्रपटात झळकणार आहे.





