Egg Price Hike: चिकन-अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ! खिशाला बसणार मोठी झळ; पाहा आजचे ताजे दर
Egg Price Hike: कोंबडी खाद्याचे वाढलेले दर आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे दर गगनाला; सर्वसामान्य ग्राहकांचे मासिक बजेट पार विस्कळीत.

Egg Price Hike – गेल्या काही दिवसांपासून चिकन आणि अंड्यांच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मासिक बजेट विस्कळीत झाले आहे. किरकोळ बाजारात चिकनचा दर प्रतिकिलो 260 रुपये, तर बॉयलर अंड्यांचा दर प्रति डझन 108 रुपये इतका पोहोचला आहे. अंड्यांच्या दराने प्रथमच शंभरी पार केल्याने ग्राहकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागातही चिकन व अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
वाढत्या किमतीमुळे मांसाहारी पदार्थ खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असून, हॉटेल व्यावसायिक, खानावळी तसेच लहान खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी पदार्थांच्या दरात वाढ करण्याची वेळ आली आहे. ग्राहकांनी वाढत्या महागाईबाबत नाराजी व्यक्त केली असून, अंडी ही गरीबांची प्रथिनांची थाळी मानली जात होती. आता तीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे, अशी भावना व्यक्त केली. व्यापार्यांच्या मते, पुरवठ्यातील अडचणी कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंड्यांचा ऐतिहासिक उच्चांक
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या अंड्यांच्या दराने यंदा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. किरकोळ बाजारात प्रथमच अंड्यांचा दर 108 रुपये प्रति डझन झाला असून, हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे.
“कोंबडी खाद्याचे वाढलेले दर, वाहतूक खर्चातील वाढ, पुरवठ्यातील घट आणि वाढती मागणी यामुळे चिकन प्रतिकिलो 260 रुपये आणि अंडी 108 रुपये प्रति डझन झाली आहेत. अंड्यांना प्रथमच इतका उच्च दर मिळाला आहे.”
– सलीम मोमिन, कादरी चिकन व्यावसायिक, आळे





