Sunil Tatkare: “अजितदादांचे विचार अन् दूरदृष्टी राज्याला सदैव मार्गदर्शक!” सुनील तटकरे यांचे भावूक उद्गार
Sunil Tatkare: स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन.

Sunil Tatkare – राजकीय, सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील अजितदादांचे योगदान आणि दूरदृष्टी राज्याला सदैव मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. दादांच्या विचारांचा वारसा आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची गौरवास्पद वाटचाल पुढेही सुरू राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे ते बारामती या राष्ट्रीय राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन केले. मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारवाडा येथे तटकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख उपस्थित होते.
ॲड. संदीप कदम यांनी आरोग्य, वाहतूक, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकत, रॅलीतून प्लास्टिकमुक्ती, प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छतेचा संदेश दिल्याचे स्पष्ट केले. रॅलीत साडेतीन हजारहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी झाले. मुख्य स्पर्धेत देशातील ४२५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले. आभार माजी आमदार विलास लांडे यांनी मानले.
दादांच्या विचारानुसार वाटचाल
हडपसर येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य सायकल स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार चेतन तुपे यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. दादांना सायकल स्पर्धेची विशेष आवड होती, जी पुणे ग्रँड टूर दरम्यान दिसून आली. आम्ही दादांची दूरदृष्टी, कामाची पद्धत आणि आदर्श शिकवण समोर ठेवूनच कार्यरत आहोत. दादांनी केलेली विकासकामे आणि त्यांची कारकीर्द नेहमीच मार्गदर्शक व स्मरणात राहणारी ठरेल, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.






