प्रभात वृत्तसेवा रांजणी – गेल्या काही दिवसांपासून शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा निर्माण झाला आहे शेवग्याच्या शेंगांचे बाजारभाव गगनाला भिडले असून बाजार समितीमध्ये शेवगा 180 ते 220 रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये 300 ते 400 रुपये किलो दराने विकला जात आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेवग्याच्या शेंगांना दोनशे वीस रुपये घाऊक दर मिळत असुन किरकोळ बाजारात पन्नास रुपयात केवळ दोन ते तीन मिळत आहे. किरकोळ बाजारातील शेवग्याचा भाव वधारला आहे.सध्या सर्वत्रच शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्यासाठी शेवगा लाभदायक असल्यामुळे वर्षभर त्याची मागणी असते. नोव्हेंबर महिन्याअखेरीस होलसेल मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगांचा भाव 200 ते 300 रुपये किलो पर्यंत पोहोचला होता. दरम्यान सफरचंदाचे दर कमी झाले असले तरी आताही होलसेल मार्केटमध्ये सफरचंदाला 100 ते 160 रुपये किलो इतका भाव मिळतो. परंतु शेवग्याच्या शेंगांना 180 ते 220 रुपये किलो दर मिळत आहे. डिसेंबरमध्ये शेवग्याची आवक कमी प्रमाणात असल्याने दर कमी झाले असले तरी सफरचंदाला 160 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असताना शेवग्याच्या शेंगांना मात्र 180 ते 220 रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये शेतकऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांच्या बागा लावल्या आहे. मात्र, उत्पादन कमी होत असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक शेवग्याला बाजारभाव मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. परतीच्या पावसामुळे यावर्षी उत्पादनावर चांगला परिणाम झाला. शेवग्याची शेंग रक्तातील घातक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते. शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा सुप आहारात घेतल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे किडनीवर होणारा परिणाम कमी होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असते. यासह व्हिटॅमिन – सी , व्हिटॅमिन – ए आणि प्रोटीनचे भांडार देखील आढळून येते. यात एंटीबायोटिक, एन्टीऑक्साईड इम्प्लिमेंटरी, डायबिटीस अँटिव्हायरल एजिंग आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात. पोटॅशियम व मॅग्नेशियम मुळे रक्तदाब नियंत्रणात येत असल्याचे रांजणी (ता.आंबेगाव) येथील डॉ.संजय घाडगे यांनी सांगितले. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. त्वचा आणि केसांसाठी देखील शेवग्याच्या शेंगा लाभदायक असल्याने इतर भाज्यांपेक्षा जास्त दराने शेंगा विकल्या जात आहेत. त्यामुळे आता सर्वत्र शेवग्याच्या शेंगांचा बोलबाला आहे आवक कमी असल्याने भाव वधारला रांजणी (ता.आंबेगाव) येथील फळ भाज्यांचा किरकोळ व्यापार करणारे व्यापारी निलेश वाघ म्हणाले, गेल्या काही वर्षात यंदा पहिल्यांदाच शेवग्याच्या शेंगांचा भाव वधारला आहे. शेतकऱ्यांकडे शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा जाणवत असून बाजारातही शेवग्याच्या शेंगांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आमच्यासारख्या विक्रेत्यांना शेवग्याच्या शेंगा जास्त दराने विकाव्या लागतात. तुटवड्यामुळे शेवग्याच्या दोन शेंगांची विक्री चाळीस ते पन्नास रुपयांना करावी लागते.