Nanded News: पाच दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना कार्यकर्त्याच्या मृत्यूचं गुढ उकललं; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी
Nanded News : २०२१ मध्येही या वादातून सोनू कल्याणकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी ते थोडक्यात बचावले होते. अखेर जुन्या वैमनस्यातूनच त्यांची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nanded News : नांदेडमध्ये पाच दिवसांपूर्वी घडलेल्या शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकर (वय ३५) यांच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून, या हत्येमागे प्रेयसीची आईच मास्टरमाइंड असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे मराठवाड्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील श्रीनगर भागात ६ एप्रिल रोजी पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सोनू कल्याणकर यांच्यावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले होते.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून इंदुबाई मंगनाळे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. Nanded News
तपासानुसार, सोनू कल्याणकर यांचे सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले असताना सोनू यांनी ते लग्न मोडल्याचा राग कुटुंबीयांच्या मनात होता.
याच सूडभावनेतून इंदुबाई मंगनाळे यांनी कट रचून मारेकऱ्यांना लाखो रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. “जोपर्यंत सोनू मरणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी आपल्या मुलाच्या मित्र पियुष शिंदे याच्याकडे केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
सुरुवातीला या प्रकरणात संबंधित तरुणीच्या भावावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पुढील तपासात वेगळेच सत्य समोर आले. आरोपी महिलेचा मुलगा कुख्यात रिंदा गँगचा सदस्य असून सध्या तो कारागृहात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, २०२१ मध्येही या वादातून सोनू कल्याणकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी ते थोडक्यात बचावले होते. अखेर जुन्या वैमनस्यातूनच त्यांची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.





