Sharad Pawar : किल्लारी भूंकंप, १९९२ मुंबई दंगलः शरद पवारांनी अशा प्रकारे हाताळली होती परिस्थिती

कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मी संघटनेच्या वतीने शरद पवार यांना महायोद्धा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन व्हाईट आर्मी आणि शिवाजी विद्यापीठ, जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापनाचे अनैक पैलू उलगडत आपले मनोगत व्यक्त करीत त्यांच्या कार्यकाळातील काही गोष्टी विस्ताराने सांगितल्या.
खासदार शरद पवार यांनी भूंकप, बॅाम्बस्फोट अशा अनेक आपत्तींमध्ये केलेले कामाबद्दल खासदार शाहू महाराज यांनी त्यांचे कौतुक केले. राज्यात येणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीमुळे एकप्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे, अशा आपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
किल्लारीच्या भूकंपामुळे अनेक संस्कार उद्धवस्त झाले होते. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. या भूकंपाच्या घटनेत त्या काळात त्यांनी कशी परिस्थिती हाताळली याबाबत त्यांनी माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील किल्लारीचा भूकंपात हजारो घरं पडली. लोकांचे मृत्यू झाले. अशावेळी इतर जिल्ह्यांची मदत घेऊन तिथली परस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला.
तसेच तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव भूकंपग्रस्त ठिकाणी भेट देणार होते. मात्र, पंतप्रधान आल्यास शासकीय यंत्रणा यांच्या दीमतीला द्यावी लागेल, त्यातून मदत कार्यात विस्कळीतपणा येईल, ही बाब नरसिंहराव यांना पटवून दिली. भूकंपग्रस्त ठिकाणी सध्या तरी येऊ नये असे त्यांना स्पष्ट सांगितले होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
१९९२ मध्ये मुंबईत दंगल वाढत चालल्याने तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची सूचना केली. त्यानुसार अवघ्या तीन ते चार दिवसात मुंबईतील कायदा सुव्यवस्था आपण रुळावर आणल्याचे पवार यांनी सांगितले.
गुजरात येथील भूजमध्ये झालेल्या भूंकपानंतरची परिस्थिती हातळण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवली. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्षपद आपल्याला दिले. त्यानुसार इतर देशातील आपत्ती संबंधताली कायदा अभ्यास करून भारतासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला असल्याचे पवार यांनी सांगितले.





